नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:07 PM2019-05-30T23:07:57+5:302019-05-30T23:10:41+5:30

मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३० ते ४० रुपये, टोमॅटो ४० रुपयांवर पोहोचले आहेत. यासोबतच वांगे ८ ते १० रुपये, फूलकोबी १५ ते २० आणि पत्ताकोबीचे भाव १० ते १२ रुपये आहेत. घाऊक बाजारात भाव आटोक्यात आहेत, पण किरकोळ बाजारात दुप्पट, तिपट्ट भावात विक्री होत असल्यामुळे लोकांना भाज्या महागड्या भावातच खरेदी कराव्या लागत आहेत.

In Nagpur, green chilli, cilantro, and tomato continue hiked | नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच

नागपुरात हिरवी मिरची, कोथिंबीर, टमाटे महागच

Next
ठळक मुद्देकाही भाज्या स्वस्त : भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३० ते ४० रुपये, टोमॅटो ४० रुपयांवर पोहोचले आहेत. यासोबतच वांगे ८ ते १० रुपये, फूलकोबी १५ ते २० आणि पत्ताकोबीचे भाव १० ते १२ रुपये आहेत. घाऊक बाजारात भाव आटोक्यात आहेत, पण किरकोळ बाजारात दुप्पट, तिपट्ट भावात विक्री होत असल्यामुळे लोकांना भाज्या महागड्या भावातच खरेदी कराव्या लागत आहेत.
आवक वाढल्याने थोडी घसरण
गेल्या आठवड्यात कॉटन मार्केटमध्ये हिरवी मिरचीचे भाव ७० रुपयांवर पोहोचले होते. स्थानिक उत्पादकांकडून आवक बंद झाली आहे. पण पंजाब, जगदलपूर आणि दिल्लीतून मिरचीची आवक मुबलक प्रमाणात सुरू झाल्यामुळे भाव ४० ते ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. पण किरकोळमध्ये ७० रुपयांत विक्री सुरू आहे. याशिवाय नांदेड, छिंदवाडा आणि नाशिक येथून कोथिंबीरची आवक वाढल्याने १५ दिवसांपासून ७० रुपयांवर पोहोचलेले दर गुरुवारी ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी झाले होते. किरकोळमध्ये कोथिंबीर ८० रुपयांवर आहे. वाढीव भावामुळे अनेक गृहिणींनी कोथिंबीरीची खरेदी बंद केली आहे.
पालकची भरपूर आवक
स्थानिक उत्पादकांकडून पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव कमी आहेत. कॉटन मार्केटमध्ये पालकचे भाव ५ ते ८ रुपये आणि घोळ भाजी १० ते १५ रुपयांत आहे. या भाज्या स्वस्त असतानाही ग्राहकांकडून मागणी कमी आहे. मेथीचे भाव अचानक वाढून ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. पंढरपूर आणि नाशिक येथून आवक कमी झाली आहे.
सदाबहार कोहळे व लवकी
कोहळे आणि लवकीची आवक नेहमीप्रमाणेच असल्यामुळे भाव स्थिर आहे. महागड्या भाज्यांवर कोहळे आणि लवकी पर्याय ठरत आहे. कॉटन मार्केटमध्ये कोहळे १५ रुपये आणि लवकीचे भाव ५ ते १० रुपये किलो आहेत. कॉटन मार्केटमध्ये चवळी शेंग २५ ते ३० रुपये आणि गवारचे ३० रुपये आहेत, पण किरकोळ बाजारात दुपटीच्या भावात विक्री सुरू आहे. याशिवाय ढेमस ३०, परवळ ४० आणि सिमला मिरची ३० रुपये किलो आहे.
भिलाई, रायपूर, दुर्ग आणि यवतमाळ जिल्ह्यातून तोंडले, नांदेड व पंढरपूर येथून कोहळे व हिरवी मिरची, मेथी, भिलाई व दुर्ग येथून सिमला मिरची आणि संगमनेर व बेंगळुरू येथून टोमॅटो विक्रीस येत आहेत.
गुरुवारी किरकोळमध्ये भाव
वांगे २५ रुपये किलो, हिरवी मिरची ७०, कोथिंबीर ७०, टोमॅटो ६०, फुलकोबी ३०, पत्ताकोबी २०, भेंडी ४०, कारले ४०, चवळी शेंग ४०, गवार ४०, वाल शेंगा ४०, बीन्स शेंगा ८०, सिमला मिरची ५०, ढेमस ५०, तोंडले ५०, परवळ ४०, फणस ४०, पालक १५, मेथी ७०, कोहळे २५, लवकी २०, मुळा ३०, गाजर ३०, काकडी ३०, कैरी ४० रुपये भाव होते.
रमझानमुळे कांदे वधारले
रमझानमुळे काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले असून आवकही कमी झाली आहे. लाल कांदे बुलडाणा, शेंगाव, मलकापूर, नांदुरा येथून तर पांढरे कांदे नाशिक आणि मनमाड या भागातून कळमन्यात येत आहेत. लाल कांद्याचे भाव १० ते १३ रुपये असून किरकोळमध्ये ३० रुपयांत विक्री होत आहे. लाल कांद्याचे भाव वाढल्यामुळे पांढरेही वधारले असून १० ते १४ रुपयांवर पोहोचले आहेत. उन्हाळी कांद्याचा साठा करता येत असल्यामुळे स्थानिकांकडून मागणी वाढली आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये अचानक तेजी आली आहे. याउलट बटाट्याचे भाव स्थिर आहेत. आग्रा, नैनपुरी, इटावा आणि अलाहाबाद येथून आवक आहे. कळमन्यात भाव १० ते १२ रुपये असून किरकोळमध्ये ३० रुपये किलो विक्रीला आहे.

Web Title: In Nagpur, green chilli, cilantro, and tomato continue hiked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.