Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
By नरेश डोंगरे | Updated: May 15, 2025 20:27 IST2025-05-15T20:24:38+5:302025-05-15T20:27:09+5:30
Nagpur Railway Passenger Theft News: या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
नरेश डोंगरे, नागपूर: विविध रेल्वे गाड्या आणि वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर संधी मिळताच रेल्वे प्रवाशांचे किंमती साहित्य लंपास करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा येथील रेल्वे पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पंकज शुभम रणगिरे (वय २२, रा. किरणापूर बडगाव, बालाघाट), रितेश उर्फ मोनू भरतलाल रणिगरी (वय २८, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) आणि जी. शंकर कनेशन (वय ३२, रा. मदुराई श्रीमंगलम, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हुसेनीपूर बिहार येथील गाैतमकुमार रॉय (वय १९) हा तरुण कामाच्या निमित्ताने नागपुरात आला होता. गावाला जाण्यासाठी तो बुधवारी रात्री रेल्वे स्थानकावर आला. गाडीला वेळ असल्याने मध्यरात्री फलाट क्रमांक तीनवर बसला. मध्यरात्री १ च्या सुमारास त्याच्या बॅगमधून अज्ञात आरोपीने २८ हजारांचा मोबाईल लंपास केला. हे लक्षात आल्यानंतर गाैतमकुमारने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. त्याची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पहाटे ३ च्या सुमारास विदिशा, मध्य प्रदेश येतील रहिवासी रंजित अहिरवार याच्या बॅगमधील मोबाईल चोरीला गेला. ही चोरीची घटना फलाट क्रमांक ८ वर घडली. अवघ्या दोन तासात दोन फलाटांवर चोरीच्या दोन सारख्या घटना घडल्याने रेल्वे पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही फलाटांवरच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणे सुरू केले.
पुन्हा हात मारण्याची तयारी
या दोन्ही चोऱ्या करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, ते ईकडून तिकडे वारंवार गर्दीच्या ठिकाणी शिरत असल्याने चोरटे सापडत नव्हते. रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बरीच शोधाशोध करावी लागली. आज दुपारी रेल्वे स्थानकावर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पंकज, रितेश आणि जी. शंकर हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांना ठाण्यात आणून झडती घेतली असता आज पहाटे चोरलेले दोन आणि अन्य तीन असे पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
गुन्हे उघड होण्याची शक्यता
या टोळीत आणखी काही सदस्य असावे, असा पोलिसांना संशय असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीश अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, अप्पर अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गाैरव गावंडे यांच्या नेतृत्वात सपोनि सुनिल उईके, एएसआय श्रीधर पेंदोर, हवलदार संजय पटले तसेच रुपेश धोंगडी, आशिष काळे आणि आरपीएफचे उपनिरीक्षक शिवराग सिंह, अश्विन पवार, कामसिंग ठाकूर, निरज कुमार आदींनी या टोळीच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावली.