लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे. भाजपने शंभराहून अधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपकडून १२० जागांवर विजय मिळेल असे दावे करण्यात आले होते. परंतु, तो आकडा गाठण्यात पक्षाला यश आले नाही.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत केवळ ५१.३८ टक्के मतदान झाले. २०१७ च्या तुलनेत मतदान दोन टक्क्यांनी घटले. १५१ पैकी भाजपने १४३ जागांवर निवडणूक लढविली होती, तर आठ जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार होते. त्यातील भाजपने १०२, तर शिंदेसेनेच्या उमेदवारांनी एका ठिकाणी विजय मिळविला. काँग्रेसने १५१ जागांवरही उमेदवार उतरविले होते. त्यातील ३४ जागांवर काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेस नेत्यांनी १०० जागांवर विजय मिळवू, असे दावे केले होते. परंतु अर्ध्या जागांवरदेखील त्यांना विजय मिळविता आला नाही. उद्धवसेनेच्या दोन उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षानेदेखील खाते उघडले व एक उमेदवार विजयी झाल्या. आप, वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळविता आले नाही व त्यांच्या पदरी निराशाच आली. एआयएमआयएम व मुस्लिम लीगच्या उमेदवारांनी मुस्लिमबहुल भागात चांगली मते घेतली आणि त्यामुळे भाजप व काँग्रेसच्या समीकरणांना फटका बसला. एआयएमआयएमचे सहा, तर मुस्लिम लीगचे चार उमेदवार विजयी झाले.
नागपूरएकूण प्रभाग एकूण सदस्य३८ १५१भाजप १०२काँग्रेस ३४शिंदेसेना १उद्धवसेना २राष्ट्रवादी (अजित पवार) १मुस्लीम लीग ४एआयएमआयएम ६बसप १
या निकालाचा अर्थ काय ?
नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले, तरी बंडखोर उमेदवार आणि एआयएमआयएम, मुस्लिम लीगच्या लढ्यामुळे पक्षाला १२० जागांचे टार्गेट साधता आले नाही.
मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळेंची जादू
नागपुरात भाजपच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सक्रिय होते. या तिघांनीही प्रचारासोबतच एकूण नियोजनातदेखील पुढाकार घेतला होता. प्रचारात स्थानिक उमेदवारांपेक्षा या तिघांचाच प्रमुख चेहरा होता. १२० जागांचे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांसमोर देण्यात आले होते. मात्र, अपेक्षित मतदान न झाल्याने भाजपच्या या 'मिशन'ला धक्का बसला व भाजपला ११० चा आकडा ओलांडता आला नाही. काही जागांवर बंडखोरामुळे भाजपच्या उमेदवारांना फटका बसला.
Web Summary : BJP secured its fourth consecutive victory in Nagpur Municipal Corporation elections, surpassing 100 seats. Despite aiming for 120, the party fell short. Congress won 34 seats. AIMIM and Muslim League gained ground, impacting BJP and Congress equations. Low voter turnout and rebel candidates affected BJP's mission.
Web Summary : भाजपा ने नागपुर नगर निगम चुनाव में लगातार चौथी जीत हासिल की, 100 से अधिक सीटें जीतीं। 120 का लक्ष्य होते हुए भी, पार्टी पीछे रह गई। कांग्रेस ने 34 सीटें जीतीं। एआईएमआईएम और मुस्लिम लीग को लाभ हुआ, जिससे भाजपा और कांग्रेस के समीकरण प्रभावित हुए। कम मतदान और बागी उम्मीदवारों ने भाजपा के मिशन को प्रभावित किया।