नागपूर विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी; गेल्यावर्षापेक्षा ४ टक्क्याने घसरला निकाल
By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2025 16:46 IST2025-05-13T16:44:57+5:302025-05-13T16:46:56+5:30
दहावीच्या निकालातही लेकीच भारी : ७ टक्के अधिक उत्तीर्ण

Nagpur division's results are the lowest in the state; Results down 4 percent from last year
निशांत वानखेडे
नागपूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १३) जाहीर करण्यात आला. नागपूर विभागासाठी बारावीप्रमाणे दहावीचा निकालही निराशाजनक ठरला. विभागात उत्तीर्णांची टक्केवारी ९०.७८ टक्के असून, राज्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. घसरलेल्या निकालातही मुली भारी ठरल्या आहेत. ९३.३४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा तब्बल ७ टक्क्याने अधिक आहेत.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून १ लाख ४७ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यातील १ लाख ४६ हजार ११३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १ लाख ३२ हजार ६५० विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. म्हणजे एकूण ९०.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्यात नागपूर विभाग नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षापेक्षा यंदाचा निकाल ४ टक्क्याने घसरला आहे. गेल्यावर्षी विभागाचा ९४ टक्के निकाल लागला हाेता व राज्यात ७व्या क्रमांकावर हाेता. यंदा ९८.८२ टक्के निकालासह काेकण विभाग प्रथम क्रमांकावर आहे.
नागपूर विभागात नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून १ लाख ५० हजार १८६ विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. त्यापैकी ७७,५७० मुली आणि ७२,६१६ मुलींची संख्या हाेती. त्यापैकी १ लाख ३४ हजार ८५६ विद्यार्थी यशस्वी झाले, ज्यामुळे ६७,०७३ म्हणजे ८६.४६ टक्के मुले आणि ६७,७८३ म्हणजे ९३.३४ टक्के मुलींचा समावेश आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ६.८८ टक्के अधिक आहे.
विभागात नागपूर ९४.३९ टक्क्यांवर अव्वल
राज्यात शेवटून पहिला असलेल्या नागपूर विभागात नागपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. नागपूर जिल्ह्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९४.३९ टक्के आहे. जिल्ह्यात ५६,३०० विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते, ज्यातील ५३,१४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी मिळून ५८,१२७ विद्यार्थी परीक्षेला बसले, ज्यापैकी ५४,३२४ उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये २७,०६६ म्हणजे ९१.२२ टक्के मुले आणि २७,२५८ म्हणजे ९५.७८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नागपूर शहरातून परीक्षेला बसलेल्या ३०,४०६ विद्यार्थ्यांपैकी २९,०८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील इतर जिल्ह्यामध्ये गाेंदिया जिल्हा ९२.८४ टक्क्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १६,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय वर्धा १३,७९५ (८८.८६ टक्के), भंडारा १३,३४७ (८८.४८ टक्के), चंद्रपूर २४,०२५ (८८.४५) व गडचिराेली ११,४६८ (८२.६७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नागपूर विभाग २.६३ टक्के विद्यार्थी ९० पार
नागपूर विभागात ९० टक्क्यांच्या वर ३५४८ म्हणजे २.६३ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण घेतले आहेत. ८५ टक्क्यांवर ५६४१ म्हणजे ४.१८ टक्के, ८० टक्क्यांवर ८०८३ (५.९९ टक्के), ७५ टक्क्यांवर १०,२१२ (७.५७), ७० टक्क्यांवर ११,९७३ विद्यार्थी (८.८७ टक्के), ६५ टक्क्यांवर १३,६८६ (१०.१५ टक्के), ६० टक्क्यांवर १७,५१५ (१२.९९ टक्के) आणि ४५ टक्क्यांवर ४५,७५४ विद्यार्थी (३३.९३ टक्के) आणि ४५ टक्क्याच्या खाली १८,४४४ विद्यार्थी (१३.६८ टक्के) उत्तीर्ण झाले.
गुणपडताळणीसाठी २८ मेपर्यंत मुदत
लागलेल्या निकालात विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास बाेर्डाच्या संकेतस्थळावर गुण पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थी १४ मे ते २८ मे २०२५ या काळात ऑनलाइन पद्धतीने अर्ज बाेर्डाकडे जमा करावे. प्रतिविषय ५० रुपये जमा करावे लागतील. उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मागविण्यासाठी प्रतिविषय ४०० रुपये जमा करावे लागतील.
"नागपूर विभागाचा निकाल कमी असला तरी ताे गुणात्मकतेवर आधारित आहे. विभागाने काॅपीमुक्त परीक्षा अभियानाची कडकपणे अंमलबजावणी केल्यामुळे जे विद्यार्थ्यांच्या डाेक्यात हाेते, तेच उत्तरपत्रिकेवर उतरले आहे. त्यामुळे हा समाधानकारक व गुणवत्तापूर्ण निकाल हाेय."
- चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर