शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दोन उमेदवारांचे पाच अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:02 IST2023-01-10T10:58:59+5:302023-01-10T11:02:21+5:30
अडबालेंचा अर्ज दाखल, झाडे आज, तर गाणार अखेरच्या दिवशी अर्ज भरणार

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दोन उमेदवारांचे पाच अर्ज दाखल
नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे अखेरच्या दिवशी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवार ठरवण्यावरून काँग्रेस व भाजपमधील पेच अजून सुटलेला नाही. सोमवारीही भाजपकडून शिक्षक परिषदेचे गाणार यांना पाठिंबा देणार, की दुसरा उमेदवार देणार हे स्पष्ट करण्यात आले नाही. काँग्रेसचेही अजून तळ्यातमळ्यात आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले की, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यावर निर्णय झालेला नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अमरावती येथे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यात व्यस्त होते. मंगळवारी नागपुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीनंतरच निर्णय होईल, असे काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण तीन अर्ज भरले. त्यांच्यासोबत माजी आ. विश्वनाथ डायगव्हाणे यांच्यासह शिक्षकवृंद होते. तत्पूर्वी जवाहर विद्यार्थी वसतिगृह, लॉ कॉलेज चौक, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे जाहीर सभा घेण्यात आली.
३१ इच्छुुकांकडून ९२ अर्जांची उचल
निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत एकूण ३१ इच्छुक उमेदवारांनी तब्बल ९२ अर्जांची उचल केली. नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा १२ जानेवारी हा अखेरचा दिवस असला तरी सोमवारपर्यंत फक्त दोन उमेदवारांनी एकूण पाच अर्ज सादर केले आहेत.
जिल्हा - अर्जांची उचल
- नागपूर : २२
- वर्धा : ०३
- चंद्रपूर : ०५
- भंडारा : ०१
३९,३९३ शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी
- निवडणुकीसाठी एकूण ३९ हजार ३९३ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली असून, यात २२ हजार ७०४ पुरूष, तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४ हजार ३८४ मतदारांची वाढ झाली आहे. गेल्या वेळी १६ उमेदवारांनी भाग्य अजमावले होते.