Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:13 IST2025-12-10T16:07:11+5:302025-12-10T16:13:56+5:30
Nagpur Crime News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपूर हत्येच्या घटनेने हादरले. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरु असतानादेखील शहरातील गुन्ह्यांवर नियंत्रण आलेले नाही. सावजी हॉटेलमध्ये झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी दोन आरोपींनी एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विशेष म्हणजे मारहाणीचे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलिसांनी त्याला जास्त गंभीरतेने न घेतल्याने आरोपींनी हत्या करत बदला घेतला.
आदित्य प्रदीप मेश्राम (वय २२, इंदोरा, बाराखोली) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रीत अजय बोरकर (२४, बाराखोली, मिसाळ ले-आऊट) व आविष्कार रवींद्र नाईक (२४, बेझनबाग) हे आरोपी आहेत.
आदित्यचा मित्र रोहितसोबत आरोपींचा झाला वाद
मृत आदित्य याचे पॉलिटेक्निकचे शिक्षण झाले होते. तो भावाच्या व्यवसायात हातभार लावत होता. आदित्य रविवारी त्याचा मित्र रोहित मस्केसोबत जेवणासाठी इंदोरामधील सावजी हॉटेलमध्ये गेला होता. तेथे असलेल्या आरोपींचा आदित्यचा मित्र रोहितशी वाद झाला होता. रोहितने त्यांना मारहाण केली होती.
दोन्ही आरोपींनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आरोपी अस्वस्थ होते. त्यांनी रोहितचा बदला घेण्याचे ठरविले. त्यांनी चाकू विकत घेतला.
आदित्य जाताना दिसला, गळ्यावर वार
सोमवारी रात्री दारू पिल्यानंतर मिसाळ ले आऊटमध्ये ते बसले होते. तेथून आदित्य जाताना दिसला. त्याने आरोपींना झालेली घटना विसरून जाण्यास सांगितले. मात्र, आरोपी संतापले व त्यांनी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. अचानक त्यांनी चाकू काढला व आदित्यच्या गळ्यावर वार केला. त्यात आदित्य गंभीर जखमी झाला.
त्याला त्याच अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले. आदित्य बराच वेळ घरी न आल्याने त्याचा मोठा भाऊ आकाशने फोन केला. तेव्हा अज्ञात व्यक्तीने फोन उचलला व आदित्य रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याचे सांगितले. आकाश तेथे पोहोचला व पोलिसांना माहिती दिली. आदित्यला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.