माझे प्रयत्न अपुरे पडताहेत... यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 11:07 IST2022-06-09T10:47:05+5:302022-06-09T11:07:09+5:30
यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या

माझे प्रयत्न अपुरे पडताहेत... यूपीएससीत तीनदा अपयश आल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर : यूपीएससीच्या परीक्षेत सलग तिसऱ्यांदा अपयश आल्याने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे त्याच्या कुटुंबियांना व मित्रांना मोठा धक्का बसला असून, पोलिसांकडूनदेखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ब्लेसन चाको (वय २८) असे तरुणाचे नाव होते व त्याने आयुष्यात आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता. मागील काही वर्षांपासून तो दिवसरात्र मेहनत घेत होता. पहिल्या दोन प्रयत्नांत त्याला यश लाभले नव्हते. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळेल, अशी त्याला आशा होती. परंतु निकाल लागल्यावर त्याचा अपेक्षाभंग झाला. यामुळे त्याला जबर धक्का बसला व तो मानसिक नैराश्यात गेला. यातूनच त्याने रविवारी सायंकाळी राहत्या घरी पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. त्यावेळी त्याचे वडील पुड्डू चाको हे चर्चमध्ये गेले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता.
सुसाईड नोटमध्ये लिहिले, माझे प्रयत्न अपुरे पडताहेत....
तपासादरम्यान त्यांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. बी. टेक. केल्यावर मी प्रशासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र माझे प्रयत्न अपुरे पडत आहेत. यामुळे मी नैराश्यात असून, जीवन संपवतो आहे, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. त्याच्या सुसाईड नोटवरून नेमके कारण समोर आले असल्याची माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी दिली.