दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा; लोकेशन शेअर करताच मिळणार मतदान बूथपर्यंत ये-जा सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:24 IST2026-01-14T20:23:09+5:302026-01-14T20:24:04+5:30
मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या नेतृत्वात ही सुविधा राबविण्यात येत आहे.

दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा; लोकेशन शेअर करताच मिळणार मतदान बूथपर्यंत ये-जा सेवा
नागपूर - क्षितिजा देशमुख
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवार, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत दिव्यांग मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मनपा प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी खास व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या नेतृत्वात ही सुविधा राबविण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांसाठी ९१७५४१४३५५ हा व्हॉट्सॲप क्रमांक निर्गमित करण्यात आला असून, या क्रमांकावर आपली लोकेशन शेअर करताच मतदान बूथपर्यंत ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सुविधेसाठी शहरातील प्रत्येक झोनमध्ये स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दिव्यांग मतदारांना त्यांच्या निवासस्थानावरून मतदान केंद्र किंवा पोलिंग बूथपर्यंत ने-आण करण्यात येणार आहे. ही व्यवस्था संबंधित झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली राबवली जाणार आहे.
दरम्यान, या संदर्भात नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये मनपातर्फे ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेदरम्यान सर्वतोपरी सहाय्यता मिळावी यासाठी मनपा केंद्रीय कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामार्फत केंद्रीय स्तरावर दोन सत्रांमध्ये दोन चमू कार्यरत राहणार असून, प्राप्त माहितीनुसार झोन स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी एकूण दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाने दिव्यांग मतदारांना या सुविधेचा लाभ घेऊन निर्भयपणे व सुलभतेने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.