कफ सिरप प्रकरणातील रुग्णांवरील उपचाराचा खर्च म.प्र. सरकार उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:02 IST2025-10-08T15:57:41+5:302025-10-08T16:02:16+5:30
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल : मेडिकलसह एम्समधील रुग्णांची घेतली भेट

MP government to bear the cost of treatment of patients in cough syrup case
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विषारी कफ सिरपमुळे गंभीर झालेल्या रुग्णांच्या उपचाराची आणि खर्चाची चिंता करू नका, उपचाराचा संपूर्ण खर्च मध्य प्रदेश सरकार करेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी नागपुरात केली.
मंगळवारी रात्री पावणेआठ वाजता उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) भेट देऊन विषारी कफ सिरपमुळे गंभीर झालेल्या बालकांची पाहणी केली आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री शुक्ल यांनी सांगितले, उपचारांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये, याची काळजी मध्य प्रदेश सरकार घेत आहे. रुग्णांच्या कुटुंबीयांवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये, यासाठी सरकार पूर्ण खर्च उचलेल. त्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची ड्युटी लावण्यात आली आहे, रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी जे शक्य असेल, ते सर्व प्रयत्न सरकार करणार आहे. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी उपस्थित होते. रात्री उशिरा त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ला भेट दिली.
निष्काळजीपणा आणि कठोर कारवाई
दूषित कफ सिरपच्या निर्मितीमध्ये झालेल्या निष्काळजीपणाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. ते म्हणाले, हे दूषित कफ सिरप तमिळनाडू येथील कांचीपूरममधील कंपनीत तयार करण्यात आले होते, त्यात निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याला जबाबदार असलेले कंपनीचे मालक, डॉक्टर आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे, तसेच काही जणांना अटकदेखील करण्यात आली आहे.
कफ सिरपच्या ४४३ बॉटल्स जप्त
या विषारी कफ सिरपच्या बॉटल्स जप्त करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. छिंदवाडा जिल्ह्यात जवळपास ६०० बाटल्या वापरण्यात आल्या होत्या, त्यापैकी ४४३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना घरोघरी पाठवून कोणाच्या घरी या बाटल्या आढळल्यास त्या जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.