मोस्ट वॉन्टेड ईप्पा अखेर गजाआड

By Admin | Updated: June 10, 2015 02:59 IST2015-06-10T02:59:37+5:302015-06-10T02:59:37+5:30

मोमीनपुऱ्यासह अनेक भागात प्रचंड दहशत असलेला मोस्ट वॉन्टेड गुंड ईप्पा ऊर्फ इरफान पीर मोहम्मद याच्या मुसक्या बांधण्यात अखेर तहसील पोलिसांनी यश मिळवले.

Most Wanted Ipaa Finally GoAge | मोस्ट वॉन्टेड ईप्पा अखेर गजाआड

मोस्ट वॉन्टेड ईप्पा अखेर गजाआड

नागपूर : मोमीनपुऱ्यासह अनेक भागात प्रचंड दहशत असलेला मोस्ट वॉन्टेड गुंड ईप्पा ऊर्फ इरफान पीर मोहम्मद याच्या मुसक्या बांधण्यात अखेर तहसील पोलिसांनी यश मिळवले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास त्याच्या घरातूनच पोलिसांनी त्याला अटक केली.
कुख्यात ईप्पावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल, खंडणी वसुली, हाणामाऱ्या, फायरिंग असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो आणि त्याच्या टोळीची मोमीनपुरा, अन्सारनगर, डोबीनगर, गांधीबाग आदी परिसरात प्रचंड दहशत आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने कब्रस्तान परिसरात फायरिंग करून दहशत निर्माण केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गवसत नव्हता.
अन्सारनगर झोपडपट्टीत त्याने एक झोपडीवजा घर भाड्याने घेतले होते. दुरून ती झोपडीच वाटत असली तरी आतमधून ईप्पाने हे घर अत्यंत पॉश बनविले होते. तेथे सुखसोयीच्या सर्वच सुविधा होत्या. याच घरातून ईप्पा आपली टोळी संचलित करून गुन्हे करायचा. हे लक्षात येताच तहसीलचे ठाणेदार संतोष खांडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी रात्री ९ वाजता ईप्पाच्या दारावर थाप दिली. आपलाच कुणी साथीदार असावा, असे समजून ईप्पाने ‘आ रे अंदर, दरवाजा खुला है’ असे म्हटले. त्याचक्षणी पोलिसांनी ईप्पाच्या घरात धडक दिली. पोलिसांना पाहून ईप्पा गोंधळला. त्याची क्रूरता लक्षात घेता सज्ज असलेल्या पोलिसांनी ईप्पावर झडप घालून त्याला जेरबंद केले.
ईप्पाला अटक करण्यात आल्याची माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तहसील ठाण्यात पोहचले. डीसीपी अभिनाश कुमार, गुन्हे शाखेच्या डीसीपी दीपाली मासीरकर यांनीही मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन ईप्पाची चौकशी केली. मंगळवारी त्याला कोर्टात हजर करून त्याची ११ जूनपर्यंत कस्टडी मिळवण्यात आली. खतरनाक ईप्पाकडून सुपारी किलिंगसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लागू शकतो.

Web Title: Most Wanted Ipaa Finally GoAge