लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना लोकाभिमुख, पारदर्शी, तत्पर सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू केला. या अंतर्गत शासनाच्या ३३ विभागाच्या १,०२७ सेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवा विहित कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहेत. यातील ५८३ सेवा ऑनलाइन असून, उर्वरित सेवा येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत ऑनलाइन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करू, असे राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे कळविले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमनाच्या दशकपूर्तीनिमित्त सोमवारी नियोजन भवन येथे सेवा हक्क दिन आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार संजय मेश्राम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी केले.
शासकीय कार्यालयात दर्शनी भागात अधिसूचित सेवांचा तपशील, कालमर्यादा, शुल्क, अपिलीय अधिकारी आदी तपशील सूचना फलकांद्वारे लावणे अनिवार्य असल्याचे बावनकुळे यांनी संदेशात स्पष्ट केले. यावेळी शासकीय सेवेबाबत असलेल्या अधिकृत दरांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी तयार करण्यात क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले.