पाच हजारांहून अधिक महिलांना गंडा ! महिलांना उद्योजक बनविण्याची बतावणी करून उकळले हजारो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:27 IST2026-04-01T15:16:07+5:302026-04-01T15:27:37+5:30
Nagpur : गरीब महिलांना व्यवसाय उघडून देण्यासाठी मदत करून देऊ व उद्योजक बनवू अशी बतावणी करत एका संस्थेच्या संचालकाने पाच हजारांहून अधिक महिलांकडून नोंदणी शुल्क घेत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

More than five thousand women cheated! Thousands of rupees were extracted by pretending to make women entrepreneurs
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीब महिलांना व्यवसाय उघडून देण्यासाठी मदत करून देऊ व उद्योजक बनवू अशी बतावणी करत एका संस्थेच्या संचालकाने पाच हजारांहून अधिक महिलांकडून नोंदणी शुल्क घेत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब महिलांनाच त्याने टार्गेट केले. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार झाली असून फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पवन वानखेडे (सिताबर्डी) असे आरोपीचे नाव असून तो गाव माझा उद्योग फाऊंडेशन नावाची संस्था चालवतो. तो प्रामुख्याने विदर्भातील विविध जिल्ह्यांतील गावांमध्ये जायचा व तेथील महिला, बचतगटांशी संपर्क साधून त्यांना त्याची स्कीम समजावून सांगायचा. महिलांना व्यवसाय सुरू करण्यास संस्था मदत करेल, तसेच सवलतीच्या दरात शासनाचे कर्ज मिळवून देऊ. संस्थेच्या माध्यमातून शासकीय जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देऊ व उद्योग उभा झाला की त्याची मालकी तुमच्याकडेच राहील, अशी बतावणी त्याने केली.
त्याने महिलांना संस्थेचा सदस्य होण्यासाठी आग्रह केला. विविध गावांतून त्याने हजारो महिलांशी अशा पद्धतीने संपर्क साधला. जवळपास पाच हजार महिलांकडून त्याने प्रत्येकी हजार रुपये नोंदणीशुल्क घेतले आणि त्यांना सदस्य बनविले. मात्र, त्याने कुणालाही व्यवसायासाठी मदत केली नाही. महिलांनी विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.
महिलांनी चौकशी केली असता त्याने फसवणूक केल्याची बाब समोर आली. काही महिलांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेत तक्रार केली. पोलिसांकडून पवन वानखेडेविरोधात चौकशी करण्यात येत आहे.
२०२२ मध्ये झाली स्थापना
पवनने गाव माझा उद्योग फाऊंडेशनची स्थापना २०२२ मध्ये केली होती. त्याने केंद्र सरकारच्या 'लखपती दीदी' योजनेसोबत काम करत असल्याची बतावणी केली. अगदी गडचिरोलीतदेखील त्याने कार्यक्रम घेतले. काही राजकारण्यांसोबत मिळून त्याने कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले होते. त्यात गडचिरोली जिल्ह्याचादेखील समावेश होता. त्याच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातदेखील फसवणुकीचा आरोप झाला व अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.