नागपुरात शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:59 IST2019-04-22T21:58:12+5:302019-04-22T21:59:48+5:30
शाळकरी मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला एका भामट्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ दाखवतानाच आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळेसुद्धा केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली.

नागपुरात शाळकरी मुलीसोबत लज्जास्पद चाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळकरी मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून तिला एका भामट्याने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ दाखवतानाच आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळेसुद्धा केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान ही घटना घडली. घनश्याम ऊर्फ संगीत सूर्यवंशी (वय २४) असे आरोपीचे नाव असून, तो हातठेल्यावर भाजी विकतो. तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली.
पीडित बालिका ११ वर्षांची असून, तिने नुकतीच सहावीची परीक्षा दिली आहे. रविवारी दुपारी तिचे आईवडील बाहेर गेले होते. ती आणि तिचा मोठा भाऊ घरी होता. दुपारी २ च्या सुमारास भाऊही निघून गेला. तेवढ्यात वस्तीत राहणारा आरोपी सूर्यवंशी तिच्या घरी आला. त्याने तिला पिण्याचे पाणी मागितले. त्यानंतर तिला बाजूला बसवून त्याने आपला मोबाईल काढला. तुला पिक्चर दाखवतो, असे म्हणत त्याने तिला अश्लील व्हिडीओ दाखवणे सुरू केले. मोबाईलवर व्हिडीओ सुरू असताना त्याने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलीने आरडाओरड केल्याने आरोपीने मोबाईल बंद केला. मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. तो शेजाऱ्याला कळताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.