हनुमान जयंतीच्या उत्सवातून बेपत्ता, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; अथर्वच्या मृत्यूने नागपूर हादरलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 22:27 IST2026-04-04T22:25:33+5:302026-04-04T22:27:06+5:30
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू;

हनुमान जयंतीच्या उत्सवातून बेपत्ता, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; अथर्वच्या मृत्यूने नागपूर हादरलं, नेमकं काय घडलं?
नागपूर/गोंडखैरी
नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका १४ वर्षीय मुलाचा मृतदेह शनिवारी (४ एप्रिल) दुपारी भरतवाडा रेल्वे उड्डाणपुलाखाली आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा प्रकार हत्या की आत्महत्या? याबाबतचे गूढ आता अधिकच गडद झाले आहे.
अथर्व दिलीप ननोरे (१४, रा. माहोरे पेट्रोल पंपजवळ, गिट्टीखदान) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याची आई रेवती ननोरे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ
शनिवारी दुपारी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाखाली एका मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कळमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, हा मृतदेह गिट्टीखदान येथून बेपत्ता असलेल्या अथर्वचाच असल्याचे निष्पन्न झाले.
घातपाताचा संशय?
अथर्वचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला, त्यावरून स्थानिकांमध्ये ही आत्महत्या नसून हत्या असावी, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि मुलाचे वय लक्षात घेता घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
कळमेश्वर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी गिट्टीखदान पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि अथर्व शेवटचा कोणासोबत दिसला होता, या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.