शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:37 IST2025-04-18T13:35:56+5:302025-04-18T13:37:06+5:30
शिक्षण विभागात विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाला असून त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत आहेत. मंत्रालयातील अधिकारीदेखील यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
नागपूर : अपात्र व्यक्तीची मुख्याध्यापकपदी नियुक्ती व शालार्थ घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या विभागात विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाला असून त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत आहेत. मंत्रालयातील अधिकारीदेखील यात सहभागी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर संघटनेतर्फे लावण्यात आला आहे. संघटनेतर्फे गुरुवारी सदर पोलिस ठाण्यात तक्रार देत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
नागपुरातील सहा शाळांमध्ये बोगस नियुक्ती झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. गोरेवाडा येथील रॉजर स्ट्रॉडस्ट्रेंड हायस्कूल येथील चार शिक्षकांची नियुक्ती बोगस असून त्यात तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी नियमबाह्य मान्यता प्रदान केली. तसेच टेकाडे हायस्कूल येथील सहायक शिक्षक शालिक भेडारकर यांचे नाव समायोजन यादीत करून कुही येथे समायोजन केले, असेही म्हटले आहे.
दुबार शिक्षकांच्या वेतनाचा घोटाळा?
रात्रशाळांतील अर्धवेळ व दुबार मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीचा घोळ शालेय शिक्षण विभागातील मंत्रालयीन कक्ष अधिकारी दत्तात्रेय शिंदे व स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. त्यांना आर्थिक देवाणघेवाणीनंतर मान्यता देण्यात येत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.
नाशिकमध्ये आणखी गुन्हे दाखल होणार
नाशिक : वेतनाच्या आकड्यात येणारी तफावत आणि अनुदानित वेतनापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकमध्ये तब्बल ७९ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर असाच मोठा प्रकार नागपूरमध्ये उघड झाला आहे.
विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानित शिक्षक बनवण्यासाठी काही शिक्षण अधिकाऱ्यांसह काही मुख्याध्यापकांची एक साखळी कार्यरत असल्याचा प्रकार नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वी उघड झाला होता. त्यामध्ये काही संस्थाही सहभागी असल्याचे म्हटले आहे.