मानसिक आजारी आईने २ मुलांना ३ वर्षे घरात कोंडले, त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:40 IST2025-09-01T13:37:29+5:302025-09-01T13:40:57+5:30
मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका आईनेच आपल्या एका सात वर्षांच्या आणि दुसऱ्या पाच वर्षांच्या मुलाला, तब्बल तीन वर्षापासून घरात कोंडून ठेवले

मानसिक आजारी आईने २ मुलांना ३ वर्षे घरात कोंडले, त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नाही
सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका आईनेच आपल्या एका सात वर्षांच्या आणि दुसऱ्या पाच वर्षांच्या मुलाला, तब्बल तीन वर्षापासून घरात कोंडून ठेवले होते. या अमानवी कोंडवाड्यात त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांना तिथून बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शरीराने कुपोषित आणि मनाने घाबरलेल्या या मुलांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे दाखल करण्यात आले.
ही घटना कशी आली समोर ? : नागपूरच्या वाडीतील लावा दाभा या गावातील एका
३३ वर्षीय मातेने तिच्या दोन चिमुकल्या मुलांना घरामध्ये कोंडून ठेवले होते. सलग तीन वर्षे ही मुले घराबाहेर पडले नव्हते. त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नव्हता. परिसरातील एका अंगणवाडी सेविकेला या प्रकाराची माहिती होताच त्यांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली. समितीने स्थानिक पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही मुलांची सुटका केली.
उपचारच नाही, मायेचा हात
-अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात बालरोग विभागातील डॉक्टरांनी उपचारच नाही, तर मायेचा हात देऊन त्यांना एक नवे जीवन दिले. मनोरुग्ण आईला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. दोन्ही मुलांची प्रकृती पाहता त्यांना २५ ऑगस्ट रोजी मेयो रुग्णालयात दाखल केले.
-आपुलकीने भरलेले उपचार शरीरालाच नाही, तर मनालाही बरे करू शकतात, याचे हे उदाहरण आहे. त्या दोन्ही मुलांना मिळालेले नवे आयुष्य हे समाजासाठी एक प्रेरणा आहे, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी दिली.