मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:56 IST2025-06-22T19:54:56+5:302025-06-22T19:56:20+5:30

वाहतूक व्यवस्था मजबूत करणार

meeting between cm devendra fadnavis and nitin gadkari countdown to kumbh mela begins all roads connecting nashik will be developed | मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार

मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी होण्याचा प्रशासनाचा अंदाज असून सरकारी पातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकला जोडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास करत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर राहणार आहे. राज्य शासन व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सखोल मंथन करण्यात आले.

प्रयागराज येथील महाकुंभात रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. नाशिकच्या कुंभमेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याचे यशस्वी नियोजन, पायाभूत रस्ते विकासाच्या सक्षमिकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र शासनाच्या पातळीवर मदत व्हावी अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खा. स्मिता वाघ, आ.देवयानी फरांदे, आ.मंगेश चव्हाण व इतर प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाशिकला मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे आहेत. त्या सर्व रस्त्यांच्या विकासासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

नाशिक रिंगरोडला मंजूर

या बैठकीत नाशिक रिंगरोडला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर नाशिक ते त्र्यंबक मार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रामुख्याने द्वारका सर्कल येथील सुविधा भक्कम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या मार्गांचा होणार विकास

- घोटी - पाहिने - त्रिंबकेश्वर - जव्हार फाटा
- द्वारका सर्कल - सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे - कोल्हार
- नाशिक ते कसारा
- सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी - शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)
- नाशिक ते धुळे
- त्र्यंबकेश्वर - जव्हार - मनोर
- सावली विहीर - मनमाड - मालेगाव
-घोटी - सिन्नर - वावी - शिर्डी
- शनिशिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) - अहिल्यानगर (खरवंडी फाटा)

Web Title: meeting between cm devendra fadnavis and nitin gadkari countdown to kumbh mela begins all roads connecting nashik will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.