विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर !

By Admin | Updated: June 10, 2015 02:54 IST2015-06-10T02:54:24+5:302015-06-10T02:54:24+5:30

महापालिकेच्या शाळेत शिकणारा डिप्टी सिग्नलसारख्या भागात राहणारा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत गणितात १०० पैकी १०० गुण मिळवू शकतो, ...

'Mathematics' matching the life of the students! | विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर !

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर !

मनपाच्या शाळेत घेतात अतिरिक्त वर्ग : विद्यार्थ्याला मिळाले गणितात १०० गुण
नागपूर : महापालिकेच्या शाळेत शिकणारा डिप्टी सिग्नलसारख्या भागात राहणारा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत गणितात १०० पैकी १०० गुण मिळवू शकतो, यावर खरं तर विश्वासच बसत नाही. पण संजयनगर हिंदी प्राथमिक शाळेत शिकणारा कमल विसराम साहू या विद्यार्थ्याने गणितात १०० गुण मिळविले. कदाचित महापालिकेच्या शाळेत हा नवा विक्रम आहे. कमलने त्यासाठी परिश्रम घेतलेच, पण त्याचे गणित शिक्षक विलास बल्लमवार यांनीही तेवढेच परिश्रम घेतले आहेत. गरीब पण गुणवंत असलेल्या, गणिताची ट्युशन लावू न शकणाऱ्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यांचे गणित जुळविण्यात बल्लमवार सरांचा मोठा वाटा आहे.
विलास बल्लमवार...! अत्यंत साधी राहणी असलेले गणित शिक्षक. महापालिकेच्या डिप्टी सिग्नल येथील संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेत गेल्या सात वर्षांपासून शिकवितात. या शिक्षकाच्या कर्तव्यनिष्ठेला सलामच करायला हवा. महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब घरचे असतात. घरात खायला कसेबसे मिळते. त्यामुळे गणिताची ट्युशन लावण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, दहावीत गुण कमी पडले तर पुढील आयुष्य अंधारमय होण्याची भीती असते. मात्र, अशा विद्यार्थ्यांसाठी बल्लमवार सर स्वत: अधिक कष्ट घेतात. दररोज सकाळी ११.४५ वाजता शाळा सुरू होते. शाळेच्या पाऊण तासापूर्वी ते गणिताचा अतिरिक्त वर्ग घेतात. आई-वडील कामाला गेल्यामुळे, रेशन दुकानात गेल्यामुळे, रॉकेलसाठी रांगेत उभे राहावे लागल्यामुळे किंवा घरातील अशाच काही कामांमुळे काही विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्गाला येणे शक्य होत नाही. त्यांनाही ते समजून घेतात. तुला जमेल तेव्हा ये, पण नक्की ये, असा प्रेमळ आग्रह ते विद्यार्थ्यांकडे धरतात. या आपुलकीमुळे विद्यार्थीही वर्गाला येण्याचा प्रयत्न करतात. खरं तर दहावीची तयारी नववीच्या निकालानंतरच सुरू होते. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की ते शाळेत २० दिवस एक्स्ट्रा क्लासेस घेतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाची तयारी करतात.

लोकमतकडून गौरव!
विद्यार्थ्यांना शिकविण्याची बल्लमवार यांच्यामध्ये असलेली तळमळ ‘लोकमत’च्या निदर्शनास आली. कुठल्याही शाबासकीची अपेक्षा नसलेल्या या शिक्षकाला लोकमतने सन्मानाचे निमंत्रण दिले व कार्यालयात सत्कार करून विद्यार्थी व पालकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: 'Mathematics' matching the life of the students!