मास्टरमाइंड राहुल पालने केली होती पैशांची मागणी ! 'जीत'च्या हत्येचे अध्याय समोर येताच प्रकरणाला वेगळे वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 18:22 IST2025-09-19T18:20:36+5:302025-09-19T18:22:47+5:30
जीत सोनेकर हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

Mastermind Rahul Pal had demanded money! As soon as the chapter of 'Jeet's' murder comes to light, the case takes a different turn
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : जीत युगराज सोनेकर (११, रा. वॉर्ड क्रमांक २, खापरखेडा, ता. सावनेर) याच्या हत्या प्रकरणात सावनेर येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने अटकेतील तिन्ही आरोपींची पाच दिवसांची म्हणजेच सोमवार (दि. २२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींना गुरुवारी (दि. १८) न्यायालयात हजर केले होते. या हत्येचा मास्टरमाइंड राहुल पाल हा उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.
जीतची हत्या करण्यात आल्याचे बुधवारी (दि. १७) सकाळी उघड झाले आणि पोलिसांनी राहुल पाल, यश वर्मा व अरुण भारती या तीन आरोपींना काही वेळात अटक केली. या तिघांनी सोमवारी (दि. १५) सायंकाळी जीतचे अपहरण केले आणि त्याच रात्री त्याची कारमध्ये गळा आवळून हत्या केली. अपहरण करून आरोपींनी जीतच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली होती, असेही तपासात उघड झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. आरोपी राहुल पाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. हत्येनंतर तो लगेच त्याच्या मूळ गावी पळून जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच हत्येचे बिंग फुटले आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
राहुलचे सोनेकर कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध होते. जीतचे वडील चनकापूरला व आई खापरखेड्याला वेगवेगळे राहतात. जीत आठ दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांकडे आल्याची माहिती राहुलने त्याचे आजोबा (आईचे वडील) यांना दिली होती. त्यामुळे आजोबाने लगेच चनकापूर गाठून त्याला खापरखेडा येथे आणले होते. राहुल त्यांचा विश्वासू होता. त्यामुळे तो खंडणीसाठी जीतचे अपहरण करून त्याची हत्या करेल, असे कुणालाही वाटले नाही. त्याने जीतच्या वडिलांना खंडणी न मागता बांदा येथे जाण्यासाठी पैशांची मागणी केली होती.
ते क्वॉर्टर जमीनदोस्त करा
चनकापूर, सिल्लेवाडा व वलनी येथे वेकोलिच्या वसाहती आहेत. त्यातील क्वार्टरमध्ये बोटावर मोजण्याइतक्याच वेकोलि कर्मचाऱ्याचे वास्तव्य असून, बहुतांश क्वार्टरवर अनेक सराईत गुन्हेगारांनी अवैध कब्जा केला आहे. यात राहुल पाल, त्याचे साथीदार यश शर्मा, अरुण भारती यांचाही समावेश आहे. हे क्वार्टर मोडकळीस आले असून, ते गुन्हेगार व अवैध धंद्यांचे अड्डे बनले आहेत. या तिघांसह अन्य गुन्हेगारांच्या ताब्यातील क्वार्टर वेकोलिने तातडीने ताब्यात घ्यावे आणि ते जमीनदोस्त करावे, अशी मागणी केली जात आहे.
आज निषेध मोर्चा
या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहे. जीतच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी; तसेच प्रकरण फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवावे, अशी मागणी बुधवारी नागरिकांनी पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे केली होती. त्यातच परिसरातील सर्वपक्षीय नेते शुक्रवारी (दि. १९) खापरखेडा येथे निषेध मोर्चा काढणार आहेत. हा निर्णय त्यांनी चनकापूर येथील चामेरी बिल्डिंगमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतला. चनकापूर येथे गुरुवारी कैंडल मार्च काढण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.