नागपुरात आधारकार्ड केंद्रावर जोरदार हाणामारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:04 IST2018-02-18T00:03:44+5:302018-02-18T00:04:47+5:30
३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोष अनावर झाल्याने शनिवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारातील आधारकार्ड केंद्रावर हाणामारीची घटना घडली.

नागपुरात आधारकार्ड केंद्रावर जोरदार हाणामारी !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोष अनावर झाल्याने शनिवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारातील आधारकार्ड केंद्रावर हाणामारीची घटना घडली. परंतु या संदर्भात पोलिसात तक्रार न दिल्याने अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालयाच्या परिसरातील आधारकार्ड केंद्रावर नागरिकांची सकाळपासून गर्दी असते. आजूबाजूच्या परिसरात जागा मिळेल तिथे नागरिक बसून क्रमांक येण्याची प्रतीक्षा करतात. सकाळपासून प्रतीक्षा करीत रांगेत घुसून फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यासोबत कर्मचाऱ्यांचा वाद झाला. रांगेतील एका नागरिकाने यावर आक्षेप घेतला. यावरून घुसणाऱ्याशी त्याची बाचाबाची झाली. आक्षेप घेणाऱ्या इसमासोबत त्याची पत्नी व दोन मुले होती. त्यांच्या देखतच घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. परंतु उपस्थित त्याच्या बचावासाठी पुढे आले नाही. ज्याला मारहाण करण्यात आली. तो दारूच्या नशेत असल्याचे कारण पुढे करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मारहाण झाल्याने संबंधित व्यक्ती आधार कार्डचे काम न करताच कुटुंबासह निघून गेली.
आधार लिंक करण्यासाठी महापालिकेतील केंद्रावर दररोज वाद होतात. जिल्हाधिकारी कार्यालय व सुविधा केंद्रावर आधार कार्ड काढण्याची सुविधा होती. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. मात्र केंद्र सरकारच्या अफलातून निर्णयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सरकारी कार्यालय परिसरातच आधार कार्ड केंद्र असणे बंधनकारक केले आहे. सध्या महापालिका मुख्यालयासह मोजक्याच केंद्रावर ही सुविधा आहे. त्यामुळे सर्वच केंद्रावर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.