'जातीमुळे लग्न शक्य नाही' म्हणाला; वर फिनाईल पाजून गर्लफ्रेंडला मारण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:18 IST2025-07-22T19:14:56+5:302025-07-22T19:18:19+5:30
Nagpur : फोटो व्हायरलची धमकी देत दुसऱ्या तरुणीवरही अत्याचार

'Marriage is not possible due to caste' said; groom tried to kill girlfriend by spraying phenyl
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत तरुणी, तसेच विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्याने समाजमन हादरले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहिल्या घटनेत, तर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केला. त्यानंतर जातीमुळे लग्न करू शकत नाही, असे सांगून तिला आत्महत्या करण्यास सांगितले व त्याहून पुढे जात त्याने तिला फिनाईल पाजून जिवे मारण्याचादेखील प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
२३ वर्षीय पीडितेची २०२१ मध्ये जाटतरोडी येथील आरोपी अंकित चंद्रकुमार भुजाडे (२४) याच्याशी ओळख झाली. नंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. अंकितने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्न करण्याचेदेखील वचन दिले. त्याने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने त्याला अनेकदा लग्नासाठी विचारणा केली. मात्र, तो दरवेळी टाळाटाळ करायचा. काही दिवसांअगोदर त्याने तिला जातीमुळे तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगितले. यामुळे तरुणीच्या पायाखालील जमीनच सरकली व माझे कसे होईल, असा सवाल तिने त्याला केला. आरोपीने तिला विष प्राशन करून आत्महत्या करण्यास सांगितले. त्याने तिला फिनाईलदेखील पाजले. त्यानंतर तो तिला जयताळा येथे सोडून पळाला. तरुणीची प्रकृती बिघडली, तेव्हा तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
गुंगीयुक्त कोल्ड्रिंक देऊन विद्यार्थिनीवर अत्याचार
- दुसरी घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीयुक्त कोल्ड्रिंक देऊन अत्याचार करण्यात आला. शमशाद अली याकूब अली (३५, रझा टाऊन, खसाळा) असे आरोपीचे नाव आहे. अगोदर तो महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करत होता.
- विवाहित असूनदेखील त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. सप्टेंबर २०२४ मध्ये लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केला.
- त्याने तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली व परत अत्याचार केला. त्याने तिच्याशी लग्न करण्यासदेखील नकार दिला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.