भ्रष्टाचाराचा डाग धुण्यास पणन अधिकाऱ्याने दिला ३९ वर्षे लढा; न्यायालयात ठरले निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:01 IST2026-02-18T18:00:09+5:302026-02-18T18:01:23+5:30
Nagpur : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे वरिष्ठ पणन अधिकारी अॅड. सुरेश ढोले यांनी स्वतःवरील भ्रष्टाचाराचा डाग धुण्यासाठी तब्बल ३९ वर्षे लढा दिला.

Marketing officer fought for 39 years to clear corruption; acquitted in court
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे वरिष्ठ पणन अधिकारी अॅड. सुरेश ढोले यांनी स्वतःवरील भ्रष्टाचाराचा डाग धुण्यासाठी तब्बल ३९ वर्षे लढा दिला. दरम्यान, ते न्यायालयामध्ये निर्दोष ठरले व दोन प्रकरणांमध्ये त्यांना एकूण एक लाख ५५ हजार रुपये नुकसानभरपाईदेखील मिळाली.
यांनी अॅड. ढोले मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपबिती सांगितली. महामंडळामध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे ताब्यात घ्यायची होती. त्यामुळे त्यांचा महामंडळामध्ये थेट नियुक्त अधिकाऱ्यांसोबत वाद निर्माण झाला.
त्यातून त्यांनी १९८६-८७ मध्ये अॅड. ढोले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर महामंडळाच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अॅड. ढोले यांच्याविरोधात फसवणूक, विश्वासघात इत्यादी गुन्ह्यांचा एफआयआर नोंदवला. तसेच, महामंडळाने १७.८४ लाख रुपये वसुलीसाठी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला. या न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०११ रोजी ढोले यांच्यावरील आरोप गुणवत्ताहीन ठरवून त्यांना पाच हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर केली तर, प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने ३ जून २०२५ रोजी त्यांना फौजदारी खटल्यामध्ये निर्दोष मुक्त केले. याशिवाय, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दिवाणी न्यायालयाने ढोले यांच्याद्वारे दाखल मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांना दीड लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर केली.
हातमाग उद्योगाला फटका बसला
प्रतिनियुक्तीवरील सरकारी अधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या वादाचा हातमाग उद्योगाला फटका बसला. हा पारंपरिक उद्योग जवळपास उद्ध्वस्त झाला. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झालेल्या अधिकाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यांची समाजात मानहानी झाली. त्यामुळे काही अधिकाऱ्यांना प्राणही गमवावे लागले, असा दावा ढोले यांनी केला.