नागपुरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भंडाफोड, २४ जणांना अटक

By योगेश पांडे | Updated: May 13, 2025 22:30 IST2025-05-13T22:28:41+5:302025-05-13T22:30:59+5:30

Nagpur News: नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला.

Marijuana den busted in Nagpur's electronics market, 24 arrested | नागपुरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भंडाफोड, २४ जणांना अटक

नागपुरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भंडाफोड, २४ जणांना अटक

योगेश पांडे, नागपूर: शहराच्या मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या सूचनेवरून विशेष पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी २४ आरोपींना तेथून अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून हा अड्डा चालत होता. मात्र, तेथील डीबी स्क्वॉडकडून या अड्ड्याला अभय मिळत असल्याची तक्रार आली. या कारवाईमुळे नागपुरात खळबळ माजली आहे.

सिताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारात अनेक दिवसांपासून गांजासोबत इतर अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत होती. तिथे गुन्हेगारांच्या हालचालींमुळे व्यापारीही घाबरले होते. दुचाकीवरून संशयास्पद लोक दिवसभर परिसरात ड्रग्ज खरेदी करण्यासाठी येत होते. सिताबर्डी पोलीस ठाण्याला ही बाब कळविण्यात आली होती. मागील आठवड्यात डीबी स्क्वॉडच्या दोन कर्मचाऱ्यांनी सूत्रधाराला ताब्यातदेखील घेतले होते. मात्र आश्चर्यजनकरित्या त्याला सोडून देण्यात आले. व्यापाऱ्यांनी याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली. तपास केल्यावर तेलीपुराच्या एका अतिशय अरुंद गल्लीत गांजा उघडपणे विकला जात असल्याची बाब समोर आली.

 पोलीस आयुक्तांनी उपायुक्त राहुल मदने यांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. मंगळवारी संध्याकाळी पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये छापा टाकला. तिथे एक आरोपी दोन पिशव्यांमध्ये गांजा विकताना आढळला. लोक त्याच्याकडून गांजा खरेदी करत होते. परिसरात स्नेहल लखनलाल चौरसिया हा आरोपी गांजा विकताना आढळला.

पोलिसांनी स्नेहलसह २४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर पोलिस आयुक्तांनी सीताबारी पोलिस ठाणे गाठले आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना फटकारले. बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Marijuana den busted in Nagpur's electronics market, 24 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.