नागपुरातील तहसीलदाराच्या कक्षात शिरस्तेदाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:55 IST2018-07-24T19:48:30+5:302018-07-24T19:55:06+5:30
प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची भावना झाल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने तहसीलदाराच्या कक्षात नझूलच्या शिरस्तेदाराला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनेने प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती.

नागपुरातील तहसीलदाराच्या कक्षात शिरस्तेदाराला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची भावना झाल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने तहसीलदाराच्या कक्षात नझूलच्या शिरस्तेदाराला मारहाण केली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनेने प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती.
शेख इकबाल शेख अहमद (रा. लेंडी तलाव, बंगाली पंजा) याच्या घराच्या जागेचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून नझूल तहसीलदाराकडे प्रलंबित होता. त्यासंबंधाने आरोपी इकबाल वारंवार संबंधितांच्या भेटीगाठी घेत होता. त्याचा अर्ज निकाली निघत नसल्याने तो संतप्त झाला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी या अर्जाची सुनावणी येथील सिव्हिल लाईनमधील नझूल तहसीलदाराच्या कार्यालयात ठेवण्यात आली होती. सायंकाळी ५.३० वाजता या अर्जाची सुनावणी सुरू असताना आरोपी शेख इकबाल संतप्त झाला. त्याने अचानक आक्रमक होत नझूल शिरस्तेदार प्रवीण विजय प्रयागी (वय ४१, रा. म्हाडा कॉलनी, हिंगणा रोड) यांच्या अंगावर धाव घेतली. त्यांना मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
चक्क तहसीलदाराच्या कक्षात हा प्रकार घडल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपीला बाकीच्यांनी कसे बसे आवरले. प्रयागी यांनी सदर ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. एएसआय अजय गरजे यांनी आरोपी शेख इकबालविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.