Maharashtra Winter Session 2022: सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय; अजित पवारांचा मिश्किल टोला, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:26 IST2022-12-19T14:25:27+5:302022-12-19T14:26:22+5:30
सभागृह सुरू होण्यापूर्वी विधान भवन परिसरात मंत्री अतुल सावे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार एकमेकांना भेटले.

Maharashtra Winter Session 2022: सावे साहेब, मंत्री झाल्यापासून लईच बदललाय; अजित पवारांचा मिश्किल टोला, काय घडलं?
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर इथं हे अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे सर्वच मंत्री, आमदार नागपुरात दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले.
सभागृह सुरू होण्यापूर्वी विधान भवन परिसरात मंत्री अतुल सावे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार एकमेकांना भेटले. यावेळी अजित दादांनी मंत्री सावे यांना मिश्किल टोला लगावत त्यांचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार म्हणाले की, सावे साहेब मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदललाय, मी देवेंद्रंना दहा वेळा सांगतोय सावेंना सांगा, इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते माणसं जोडायची असतात असं अजित पवारांनी म्हटलं. त्यानंतर माझा स्वभाव दादा तुम्हाला माहित्येय असं उत्तर मंत्र्यांनी दिले. सभागृहाबाहेर महापुरुषांची पुस्तके मंत्र्यांना भेट म्हणून दिली जात होती. अजित पवारांनी ही पुस्तकं अतुल सावे यांना दिली.
सभागृहात अजित पवारांनी सरकारला धारेवर धरलं
महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव प्रवेशबंदीची मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीमावाद उफाळून आला असून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण आहे. सीमावादाच्या या प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा निघणे अपेक्षीत होते. मात्र ते होताना दिसत नाही. गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुध्दा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम आहे असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, कर्नाटकने आपली आडमुठी भूमीका कायम ठेवली आहे, दि. १९ डिसेंबर रोजी बेळगावात येण्याची परवानगी खासदार धैर्यशील माने यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती. परंतु आपल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत त्यांना बेळगावात बंदी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्याची आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाची महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमीका समोर येत असल्याने मराठी भाषकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या दडपशाहीच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. कर्नाटक सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नाही असा इशाराही संतापलेल्या अजित पवार यांनी दिला.