कांजिण्यासारखा दिसणारा, पण वेगळा: हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम आजार वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:47 IST2025-06-23T19:46:24+5:302025-06-23T19:47:13+5:30

लहान मुलांमध्ये वाढतोय संसर्ग : लक्षणे ओळखा, प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन

Looks like chickenpox, but different: Hand, foot, mouth syndrome disease on the rise | कांजिण्यासारखा दिसणारा, पण वेगळा: हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम आजार वाढतोय

Looks like chickenpox, but different: Hand, foot, mouth syndrome disease on the rise

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सध्या लहान मुलांमध्ये 'हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम' या आजाराची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. हा आजार कांजिण्यासारखा दिसत असल्याने अनेकदा पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, परंतु तो पूर्णपणे वेगळा आहे. हा विषाणूजन्य आजार असून, त्याची वेळीच लक्षणे ओळखून योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून संसर्ग वाढणार नाही, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिला आहे.


'हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम' हा एंटरोव्हायरस नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात प्रामुख्याने रकॉक्ससॅकीव्हायरस ए १६ हा विषाणू कारणीभूत असतो, परंतु इतर एंटरोव्हायरसही हा आजार घडवू शकतात. हा आजार प्रामुख्याने पाच वर्षाखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, परंतु मोठ्या मुलांना आणि क्वचित प्रौढांनाही होऊ शकतो. हा आजार सामान्यतः गंभीर नसतो, परंतु योग्य काळजी न घेतल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. 


अशी घ्या काळजी

  • मुलांना वारंवार साबणाने आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावा. ज्या मुलांना हा आजार झाला आहे, त्यांना शाळेत किंवा पाळणाघरात पाठवू नका.
  • खेळणी, दरवाजांचे हँडल, नळ यांसारख्या वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू नियमितपणे स्वच्छ करा आणि निर्जतुक करा. मुलांना तोंडाची स्वच्छता राखण्यास शिकवा. त्वचेवरील फोड फोडू नका, कारण त्यातील द्रवपदार्थात विषाणू असतो.


या लक्षणांकडे लक्ष द्या
'हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम'ची लक्षणे साधारणपणे विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर ३ ते ७ दिवसांनी दिसू लागतात. सुरुवातीला हलका ते मध्यम ताप येऊ शकतो. घशात दुखणे किंवा खाज सुटते, तोंडात, विशेषतः जीभ, हिरड्या आणि गालाच्या आतमध्ये लहान, वेदनादायक लाल फोड येतात. हे फोड नंतर अल्सरमध्ये बदलू शकतात, ज्यामुळे खाणे-पिणे कठीण होते.

  • त्वचेवरील पुरळ : हाताचे तळवे, पायाचे तळवे आणि कधीकधी नितंबांवर लालसर पुरळ उठते. हे पुरळ लालसर ठिपक्यांसारखे दिसते आणि काहीवेळा त्यावर लहान फोड येऊ शकतात. हे फोड खाजरे नसतात, परंतु ते वेदनादायक असू शकतात.
  • अशक्तपणा आणि चिडचिडेपणा : लहान मुलांमध्ये भूक न लागणे, ऊर्जा कमी होणे आणि चिडचिडेपणा ही लक्षणे दिसतात.


संसर्ग कसा पसरतो ?
'हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम' हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. तो संक्रमित व्यक्तीच्या तोंडातील स्त्राव, फोडांमधील द्रव, शिंकणे किंवा खोकण्याद्वारे पसरू शकतो. विषाणू असलेल्या वस्तूंना स्पर्श करून नंतर तोच हात तोंडाला लावल्यास होऊ शकतो.


"सध्या लहान मुलांमध्य 'हॅन्ड, फूट, माउथ सिंड्रोम'ची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. हा एक विषाणूजन्य आजार असला तरी, तो सामान्यतः गंभीर नसतो. या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार किंवा लस उपलब्ध नाही. ताप, तोंडातील फोड किंवा हाता-पायांवर पुरळ दिसल्यास तातडीने बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यामुळे योग्य निदान होऊन आवश्यक काळजी घेता येते. गुंतागुंत टाळता येते. या वर्षी हा आजार मोठ्यांमध्येही आढळून येत आहे. विशेष म्हणजे, 'हॅन्ड, फूट, माउथ'सोबतच इतरही ठिकाणी पुरळ दिसून येत आहे."
- डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ.

Web Title: Looks like chickenpox, but different: Hand, foot, mouth syndrome disease on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.