लोकमत एक्सक्लुसिव्ह : कोलंबोमध्ये क्रिकेटचा महासंग्राम; भारताचा दर ३० पैसे तर पाकिस्तानला ३ रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 00:58 IST2026-02-15T00:57:06+5:302026-02-15T00:58:02+5:30
भारत–पाक क्रिकेट सामन्याची सट्टा बाजारात जबरदस्त क्रेझ; विदर्भातून ७०० कोटींची खयवाडी होण्याची अपेक्षा...

लोकमत एक्सक्लुसिव्ह : कोलंबोमध्ये क्रिकेटचा महासंग्राम; भारताचा दर ३० पैसे तर पाकिस्तानला ३ रुपये!
नरेश डोंगरे -
नागपूर : परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी, १५ फेब्रुवारीला कोलंबोत महासंग्राम रंगणार आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागले असतानाच सट्टा बाजारातही या महामुकाबल्याची जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. एकट्या विदर्भाच्या सट्टा बाजारातून ७०० कोटींची खयवाडी होण्याची अपेक्षा बुकी वर्तवित आहेत.
विशेष म्हणजे, सामन्याच्या २४ तासांपूर्वीच सट्टा बाजाराने भारताचा विजय पक्का असल्याचे संकेत देऊन भारताला केवळ ३० पैसे तर पाकिस्तानला विक्रमी असा ३ रुपयांचा रेट दिला आहे.
सट्टा बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत टॉस जिंकल्यास पाकिस्तानचा भाव ३ रुपये, तर भारताचा केवळ ३० पैसे राहणार आहे. तर, भारत टॉस हरल्यास पाकिस्तानचा भाव २.५ रुपये, तर भारताचा ४० पैसे ठरवला गेला आहे. अर्थात, सट्टा बाजाराने भारताच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.
या एकाच सामन्यावर देशभरात हजारो कोटींचा तर नागपूरसह, विदर्भात 700 कोटींचा आणि मध्य भारतात १५०० कोटींचा खयवाडी-लगवाडीची (सट्टा लागण्याची) शक्यता 'बुकी वर्तुळातून' वर्तविली जात आहे.
स्टार प्लेअरवर कोट्यवधींचे दांव -
या थरारक सामन्यात स्टार खेळाडूंवरही कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याचे सांगितले जाते. विशेषतः स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि त्यानंतर शूभमन गिल, सूर्यकुमार यादव यांच्यावर क्रिकेट प्रेमींसोबतच बुकी बाजारातूनही मोठा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फलोदी, इंदूर सट्टा बाजाराची भविष्यवाणी -
राजस्थानमधील प्रसिद्ध फलोदी तसेच मध्यप्रदेशातील इंदोर सट्टा बाजारानेही या लढतीबाबत अंदाज व्यक्त करताना टीम इंडियाचे पारडे जड असून भारत पाकिस्तानवर मात करेल, असे सरळ गणित मांडले आहे.