नागपुरात शिरला बिबट्या ! पारडीच्या हनुमाननगरात शिरल्याने खळबळ; सुदैवाने कोणावरही नाही केला हल्ला
By दयानंद पाईकराव | Updated: November 19, 2025 16:43 IST2025-11-19T16:41:12+5:302025-11-19T16:43:29+5:30
Nagpur : वन विभागाने केले रेस्क्यु : सुदैवाने कोणावरही केला नाही हल्ला, घटनास्थळी बघ्यांची गर्दी

Leopard enters Nagpur! Panic as it enters Hanumannagar in Pardi; Fortunately, it did not attack anyone
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडीच्या हनुमाननगरात एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट शिरल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती पारडी पोलिस व वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाने दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास बिबट्यास ट्रॅक्युलाईज करून पिंजऱ्यातून ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरला नेले अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पारडीच्या हनुमाननगरात अनिल राऊत हे आपली पत्नी, मुलगा आलोक, अनिकेत आणि मुलगी अंजली तसेच आई, भाऊ, वहिनी व त्यांच्या दोन मुलांसह एका दुमजली इमारतीत राहतात. सकाळी ९ वाजता अनिल राऊत यांचा दहावीत शिकत असलेला १५ वर्षांचा मुलगा आलोक आंघोळ केल्यानंतर दुसऱ्या माळ्यावर बांधकाम सुरु असलेल्या खोलीत कपडे आणण्यासाठी गेला. तेथे त्याने दार उघडताच त्याला एक लांब शेपूट दिसली. घाबरलेल्या अवस्थेत त्याने खाली येऊन वडिलांना माहिती दिली. त्याच्या वडिलांनी तातडीने पारडी पोलिस व वन विभागाला याबाबत सूचना दिली. त्यानंतर पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ४.३० तास प्रयत्न करून ट्रॅंक्युलाईज करून बिबट्याला पकडून पिंजऱ्यात टाकले. त्यानंतर या बिबट्याला ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले.