फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण-विनयभंग; येथून निघून जा, नाही तर..., पालकांना जीवे मारण्याची धमकी
By योगेश पांडे | Updated: February 11, 2024 22:21 IST2024-02-11T22:21:04+5:302024-02-11T22:21:56+5:30
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण-विनयभंग; येथून निघून जा, नाही तर..., पालकांना जीवे मारण्याची धमकी
नागपूर : एका फेसबुक फ्रेंडने अल्पवयीन मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण करत तिचा विनयभंग केला. तिला परत आणण्यासाठी गेेलेल्या तिच्या आईवडीलांना त्याने जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
पियुष करण निलपाल (२१, लष्करीबाग, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. त्याची १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यांच्या मैत्री झाली. पियुष तिला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ येऊ लागला. त्याने अनेकदा तिचा पाठलागदेखील केला. हा प्रकार तिच्या पालकांना समजला. त्यांनी मुलीला त्रास देऊ नको असा सल्ला दिला. यावेळी पियुषने तिच्या वडिलांना बघून घेण्याची धमकी दिली होती. कुटुंबाची बदनामी होईल या विचाराने पालक पोलिसांत गेलेच नाही. त्यामुळे पियुषची हिंमत वाढली. ९ फेब्रुवारी रोजी पियुषने तिला जबरदस्तीने सोबत नेले.
मुलगी पियुषच्या घरी असल्याचे समजतात पालक त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्याने परत पालकांना शिवीगाळ केली व ‘येथून निघून जा, नाही तर कापून टाकेन’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने मुलीचा विनयभंग केला व पालकांसोबत जाण्यापासून रोखले. अखेर तिच्या आईने नंदनवन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आरोपी पियुषवर लगेच गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर तो फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.