कासवांची सुपरफास्ट तस्करी पकडली

By Admin | Updated: June 2, 2015 01:55 IST2015-06-02T01:55:05+5:302015-06-02T01:55:05+5:30

हजरत निजामुद्दीन-पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून तब्बल १०० छोटे कासव जप्त करण्यात आले. यासोबतच दोन

Kanswai's Superfast trafficking caught | कासवांची सुपरफास्ट तस्करी पकडली

कासवांची सुपरफास्ट तस्करी पकडली

नागपूर : हजरत निजामुद्दीन-पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून तब्बल १०० छोटे कासव जप्त करण्यात आले. यासोबतच दोन आरोपींनाही अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली असून कासवाची होत असलेली ‘सुपरफास्ट’ तस्करी उघडकीस आणली. कासव हे वन्यजीव श्रेणीमध्ये मोडत असल्याने यासंबंधात माहिती मिळताच वन विभागाची एक चमू रेल्वे पोलीस (जीआरपी) ठाण्यात पोहोचले.

सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्थानिक गुन्हे शाखेची चमू गस्तीवर असताना त्यांना निजामुद्दीन-पुड्डुचेरी एक्स्प्रेसच्या एस-७ कोचमध्ये दोन इसम संदिग्ध अवस्थेत आढळून आले. त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांच्याजवळ लहान कासव आढळून आले. शिवकुमार सीतारंगू व जी. सीताचंद्रबाबू (कर्नाटक) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींनी तीन बॅगमध्ये कासव भरून ठेवले होते. कासवांना पायात घालणाऱ्या मोज्यांमध्ये आणि कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. पोलीस सूत्रानुसार इटारसीवरून कर्नाटकच्या एका व्यापाऱ्याने या कासवांची खरेदी केली होती. त्या व्यापाऱ्याने आपल्यासोबत दोन व्यक्तींना आणले होते. कासवांसोबत या दोन व्यक्तींना रेल्वेगाडीत बसवून व्यापारी विमानाने हैदराबादला रवाना झाला. गुंटूर येथे हा माल सोपविण्यास सांगण्यात आले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Kanswai's Superfast trafficking caught