आध्यात्मिक प्रशिक्षणाचा पत्रकारिता अभ्यासक्रमात समावेश असावा

By Admin | Updated: August 24, 2016 03:01 IST2016-08-24T03:01:46+5:302016-08-24T03:01:46+5:30

पत्रकारितेच्या क्षेत्रातील दगदग फार वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांनी शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ राहण्याची आवश्यकता आहे.

Journal of spiritual training should be included in the syllabus | आध्यात्मिक प्रशिक्षणाचा पत्रकारिता अभ्यासक्रमात समावेश असावा

आध्यात्मिक प्रशिक्षणाचा पत्रकारिता अभ्यासक्रमात समावेश असावा

सच्चिदानंद जोशी : नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद
विभागाच्या ‘कॅम्पस’ पत्रिकेचे प्रकाशन
नागपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रातील दगदग फार वाढली आहे. त्यामुळे पत्रकारांनी शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ राहण्याची आवश्यकता आहे. या मुद्यांवर आधारित प्रशिक्षणाचा पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे मत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘कॅम्पस’ या पत्रिकेचे मंगळवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.
पत्रकार जे काही म्हणतात किंवा लिहितात त्याचा समाजावर प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी अध्यात्माची मौलिक मदत होऊ शकते. अध्यात्माला कुठल्याही धर्माशी जोडणे योग्य नाही, असे प्रतिपादन डॉ.जोशी यांनी केले. पत्रकारितेमध्ये धावपळ वाढली आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या व्यायामाच्या माध्यमातून पत्रकारांनी ‘फिटनेस’कडे लक्ष दिले पाहिजे. सोबतच या क्षेत्रात मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात राहतो. अशा वेळी डोके शांत ठेवून संतुलित बातमी देण्यासाठी बौद्धिक सुदृढता आवश्यक आहे. तरुण पत्रकारांनी सुरुवातीपासूनच या तिन्ही बाबींवर भर दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चांगला पत्रकार बनण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असते असेदेखील ते म्हणाले.विभागप्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी यावेळी प्रास्ताविकातून ‘कॅम्पस’बाबत माहिती दिली. अंकिता देशकर व वनश्री पांढरे या विद्यार्थिनींनी ‘कॅम्पस’च्या निर्मितीबाबत अनुभव सांगितले. छवी शेजवलकर हिने संचालन केले तर कोनिका मिगलानी हिने आभार मानले. यावेळी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.मोईज हक व ‘ई-लर्निंग’तज्ज्ञ आनंद भिसे हेदेखील उपस्थित होते. ‘कॅम्पस’मध्ये विभागातील ‘बीजे’ व ‘एमए’ या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे लेख, कविता, छायाचित्रे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Journal of spiritual training should be included in the syllabus