संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:26 IST2020-08-08T21:24:46+5:302020-08-08T21:26:46+5:30
गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी काटोल रोड चौकातील जंक्शन फंक्शन हॉलमध्ये झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, माजी आ. प्रकाश गजभिये, प्रवक्ते प्रवीण कुंटे, दिलीप पनकुले, शब्बीर विद्रोही, दुनेश्वर पेठे, वेदप्रकाश आर्य, अशोक काटले, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नूतन रेवतकर, रिजवान अन्सारी, रवींद्र इटकेलवार, मधुकर भावसार आदी उपस्थित होते.
सत्ता नव्हती तेव्हा लोक भाजपच्या तंबूत दिसायचे. आता सत्ता व गृहमंत्रिपद मिळाल्यामुळे बैठकांमधील गर्दी वाढू लागली आहे. नवनवे चेहरे येऊ लागले आहेत. मात्र, पडतीच्या काळात सोबत राहिलेल्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळावा, अशी अपेक्षा प्रमुख पदाधिकाºयांनी व्यक्त केली. समित्या, मंडळ, महामंडळावरील नियुक्ती त्वरित करा. पक्ष कार्यकारिणीवरही स्थान द्या तसेच विविध आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
शहरासाठी कोअर कमिटी
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करून प्रत्येक बूथवर नियोजन करण्यासाठी नागपूर शहरासाठी कोअर कमिटी नेमली जाईल. त्यात महत्त्वाच्या पदावर असलेल्या तसेच अनुभवी लोकांना स्थान दिले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
१५० वर कार्यकर्त्यांना परवानगी कशी ?
शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी टाळण्याचे, उपाय योजण्याचे आवाहन प्रशासनातर्फेकेले जात आहे. एवढेच नव्हे तर लग्न सोहळ्यासाठीही फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची अट आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या या बैठकीला १५० वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनापरवानगी झालेल्या या गर्दीची आता महापालिका प्रशसन दखल घेणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.