लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात महिंद्रा, अदानी, गॅलेक्सी सोलर अशा मोठ्या उद्योगांसह इतरांनी तब्बल ४२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. ही मोठी उपलब्धी आहे. यामुळे नागपूर व संपूर्ण विदर्भाची परिस्थिती बदलेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित तिसऱ्या अॅडव्हांटेज-विदर्भखासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप रविवारी पार पडला. याप्रसंगी केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजे, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, लॉइड मेटल्स अँड एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, डीआरडीओचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. व्ही. के. सारस्वत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, टाटा स्टीलचे उपाध्यक्ष डी. बी. सुब्रह्मण्यम, निखिल मुंडले, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे गुमास्ते, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, आमदार आशिष देशमुख, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजय कुमार शर्मा, मनपा सत्तापक्षनेता नरेंद्र बोरकर, नाना शामकुळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, प्रा. अनिल सोले, अनिस अहमद, सारडा, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, सेबीचे सोनपरोते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बेस्ट स्टॉल पुरस्कार महा मेट्रोला प्रदान करण्यात आला, तसेच विविध एमएसएमई पुरस्कार प्राप्त उद्योजक व संस्थांचा सत्कारही करण्यात आला. नितीन गडकरी यांनी महोत्सवात २३ देशांचे राजदूत तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींची उपस्थिती असल्याचे सांगत अॅडव्हांटेज विदर्भमुळे विदर्भाला आंतरराष्ट्रीय एक्सपोजर मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
यामुळे विदर्भाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल, युवकांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कृषी उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, पर्यटन क्षेत्र आणि खनिज संपदा उद्योगाची भरभराट होईल; पण यासोबत असोसिएशनने सेक्टरनिहाय काम करण्याचा सल्ला देत विदर्भातील २५ विशिष्ट औद्योगिक सेक्टर ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. डॉ. पंकज भोयर यांनी या महोत्सवामुळे नागपूरच नाही, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना लाभ मिळेल, असे समाधान व्यक्त केले. एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रस्ताविकातून ४२ हजार कोटींचे करार झाल्याचे व २२ विद्यार्थ्यांच्या नवीनतम कल्पनांना ५.५ कोटींचे फंडिंग मिळाल्याची माहिती दिली. संचालन आसावरी देशपांडे यांनी केले, तर डॉ. विजय शर्मा यांनी आभार मानले.
उद्योजकांनी ग्लोबल मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करावे
एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी भारताच्या जीडीपीमध्ये ३३ टक्के आणि निर्यातीमध्ये ४५ टक्के वाटा एमएसएमईचा असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांत एमएसएमई पोर्टलवर देशातील ३३ कोटींच्या वर उद्योजकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योगांसमोर कौशल्ययुक्त कामगार, जगातील नवीन तंत्रज्ञान, उद्योग उभारण्यासाठी फंड, निर्यात आणि ग्लोबल मार्केटिंग, अशी आव्हाने आहेत. सरकार कौशल्य विकास, फंड व निर्यातीबाबतची आव्हाने सोडवत आहे; पण उद्योजकांना नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे व जगाला आकर्षित करेल, अशी मार्केटिंग व पॅकेजिंग तंत्र शिकावे लागेल, असा सल्ला करंदलाजे यांनी दिला. त्यांनी औद्योगिक महोत्सवासारख्या आयोजनामुळे विदर्भाची ओसाड प्रदेश ही जुनी ओळख पुसली जात असल्याची भावना व्यक्त केली.
Web Summary : A three-day industrial fair in Nagpur saw ₹42,000 crore investment pledges from major companies. Nitin Gadkari believes this will transform Vidarbha's socio-economic landscape, creating jobs and boosting key sectors. Focus on specific industries is crucial for sustained growth.
Web Summary : नागपुर में तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनी में प्रमुख कंपनियों से 42 हजार करोड़ रुपये के निवेश की प्रतिज्ञाएँ। नितिन गडकरी का मानना है कि इससे विदर्भ का सामाजिक-आर्थिक परिदृश्य बदलेगा, रोजगार सृजित होंगे और प्रमुख क्षेत्रों को बढ़ावा मिलेगा।