रेल्वेत ‘प्रिन्स’ची हुशारी, आरपीएफची झाडाझडती, १४ लाखांचा गांजा जप्त
By नरेश डोंगरे | Updated: May 4, 2024 21:16 IST2024-05-04T21:15:59+5:302024-05-04T21:16:12+5:30
हमसफर, गोंडवाणा एक्सप्रेसमध्ये कारवाई, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील आरोपी, तीन महिलांसह पाच तस्कर जेरबंद...

रेल्वेत ‘प्रिन्स’ची हुशारी, आरपीएफची झाडाझडती, १४ लाखांचा गांजा जप्त
नागपूर : हमसफर आणि गोंडवाणा एक्सप्रेसमधून होणारी गांजाची तस्करी उघड करून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दिल्ली तसेच पश्चिम बंगालमधील पाच आरोपींना जेरबंद केले. गांजा तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे, हे विशेष !
गांजाची पहिली मोठी खेप तिरूपती जम्मूतावी हमसफर एक्सप्रेसमध्ये प्रिंस नामक श्वानाने पकडून दिली. ही गाडी बल्लारशाह येथून नागपूरला निघाली असता विकास कुमार आणि नीरज यांच्यासह धावत्या गाडीत तपासणी करणाऱ्या प्रिन्स नामक श्वानाने कोच नंबर बी- २ मधील १७, २० आणि २३ नंबरच्या सीटखाली असलेल्या बॅगचा संशय आला. त्याने तसे संकेत दिल्यानंतर हॅण्डलरने त्या बॅग घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बॅग उघडण्यास सांगितले. त्यानंतर त्यातून ८२ किलो, ६६६ ग्राम वजनाची गांजाची वेगवेगळी ४० पाकिटं निघाली. हा गांजा घेऊन जाणाऱ्या या आरोपींची नावे दीपाली बाला (वय ३६, रा. तुगलकाबाद, नवी दिल्ली), दीपाली दस (वय ५०, रा. तुगलकाबाद, दिल्ली), मीरा सरकार (वय ४२, रा. हिरपूर छितका, नडिया, प. बंगाल), अमलेश ब्रम्हा (वय ३६, रा. तुगलकाबाद, दिल्ली) आणि विश्वजीत मंडल (वय ३९, रा. नटूनविरपूर, नडिया, प. बंगाल) अशी आहेत. त्यांना नागपूर स्थानकावर उतरवण्यात आले. येथे रितसर पंचनामा केल्यानंतर १२ लाख, ४० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण रेल्वेपोलिसांकडे सोपविण्यात आले.
आरपीएफच्या दुसऱ्या एका पथकाने हजरत निजामुद्दीन गोंडवाणा एक्सप्रेसच्या दिव्यांगासाठी असलेल्या कोचमधून ८ किलो ३४७ ग्राम गांजा भरलेल्या दोन ट्रॉली बॅग जप्त केल्या. या गांजाची किंमत १ लाख, २५ हजार, २०५ रुपये एवढी आहे. हा गांजा तस्करी करणारे कोण, ते स्पष्ट झाले नाही. या दोन्ही प्रकरणात पकडण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत १३ लाख, ७५ हजार, ९९९ रुपये आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार आणि सहायक सुरक्षा आयुक्त कुमार कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफच्या नार्कोस टीमने ही कामगिरी बजावली.