निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
By योगेश पांडे | Updated: September 15, 2025 15:26 IST2025-09-15T15:21:35+5:302025-09-15T15:26:32+5:30
Nagpur : मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे.

Innocent Saanvi's life lost; Schools' eyes on 'profit' rather than safety, two lost their lives due to contractor's work
योगेश पांडे
नागपूर : अभ्यासाच्या भरवशावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून जगाच्या आसमंतात उत्तुंग भरारी घेण्याची तिची स्वप्ने होती. त्यादृष्टीने तिचे प्रयत्नदेखील सुरू होते. मात्र, सकाळी आईला 'टाटा' करून शाळेत निघालेल्या सान्वीचा पुढील काही क्षणांतच घात झाला अन् भरधाव स्कूल व्हॅन-बसच्या अपघातात निष्पाप मुलीला जीव गमवावा लागला. तिचा मृत्यू झाल्यावर राजकारण्यांना रस्त्यांचे अपूर्ण काम आठवले व आंदोलन झाले. पोलिस व आरटीओ प्रशासनाकडून पुढील काही दिवस स्कूल व्हॅनचालकांविरोधात एखादे 'ऑपरेशन' राबविण्यात येईल. तर शाळा प्रशासनाकडून तीन दिवसांतच नियमित कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. मात्र, या सर्वात स्वतःच्या पायावर उभी राहण्याचे स्वप्ने पाहणाऱ्या सान्वीची चूक तरी काय, या प्रश्नाचे उत्तर कुणीही देऊ शकणार नाही.
मुर्दाड प्रशासन आणि संवेदनशीलता गमवत असलेल्या शाळांचा आंधळा कारभार असाच सुरू राहणार आणि जनमाणसासमोर 'बघा, चिडा आणि शांत बसा' हे करण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरणार नाही, हेच वास्तव आहे. आणखी किती सान्वी गमावल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे, हा सवाल उपस्थित होत आहे. शुक्रवारी मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल व्हॅन आणि बसमध्ये सकाळी आठ वाजता जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात बी. पी. भवन्स विद्यामंदिर, कोराडी येथील १४ वर्षीय विद्यार्थिनी सान्वी देवेंद्र खोब्रागडे व व्हॅनचालक ऋतिक खोब्रागडे यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, व्हॅनच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. व्हॅनच्या सर्व काचा फुटल्या व दरवाजादेखील निखळला. हा अपघात का झाला, यात चालकाची चूक होती की संथ गतीने रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा दोष होता हे चौकशीतून बाहेर येईलच. मात्र तांत्रिक चुकीपेक्षा एकूण मानसिकतेवरच या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आरटीओ-पोलिसांबाबत 'नो कमेंन्ट्स'
शहरात दररोज व्हॅन व बसचालकांकडून नियमांचा खेळखंडोबा सुरू असतो. मात्र पोलिस प्रशासन मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून विविध 'ऑपरेशन्स' राबवत स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहे. तर 'आरटीओ'तील कार्यप्रणाली किती 'अर्थपूर्ण' आहे हे एकदा तेथे गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यालादेखील लक्षात येते. एखादा मोठा अपघात झाला की मोहीम राबविण्याचा 'फार्स' करण्यात येतो. मात्र आठवड्याभरातच परत स्थिती 'जैसे थे' होते. त्यामुळे मस्तवाल व्हॅनचालक व बसचालकांमध्ये वाट्टेल तशी वाहने चालविण्याची हिंमत वाढते.
शाळांचे 'चित भी मेरी और पट भी'
- मागील काही काळापासून शाळांकडून विविध माध्यमांतून 'प्रॉफिट' कसा मिळेल यावर भर दिसून येतो. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना आणणाऱ्या बसचे चालक वाहन कसे चालवत आहेत, त्यातील जीपीएस व शाळेचे अंतर यादरम्यान वेगमर्यादेचे उल्लंघन होत आहे का, हे पाहण्याची तसदी कुणीच घेत नाही.
- अनेक व्हॅनचालकांना वेगाने वाहने चालविण्यास काही शाळा मुख्याध्यापकच अप्रत्यक्षपणे भाग पाडतात. शाळा ९ वाजताची असली तरी ८:५० नंतर शाळेत विद्यार्थ्यांना व व्हॅनला प्रवेश मिळणार नाही, असा फतवाच काढण्यात येतो. काही शाळांचे दरवाजेदेखील बंद करण्यात येतात.
- अशा स्थितीत नाइलाजाने काही चालक वेग वाढविताना दिसून येतात. मात्र, अपघात झाल्यावर तो चालक आमच्या शाळेचा नव्हता, असे म्हणत शाळा प्रशासनाकडून हात वर करण्यात येतात. त्यांच्यावर कारवाईसाठी कुणीच पुढाकारदेखील घेत नाही, हे दुर्दैवी चित्र आहे.
हजारो विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार
- शहरात सकाळी साडेसहा ते नऊ या कालावधीत हजारो स्कूल व्हॅन व स्कूल बसमधून विद्यार्थी शाळांमध्ये जातात.
- अनेक व्हॅन व बसचालक नियमांचे पालनदेखील करतात. मात्र, बरेच चालक नियमांची ऐशीतैशी करत भर चौकांमध्ये गतीने वाहने चालवून मुलांच्या आयुष्याशी अक्षरशः खेळ करताना दिसतात.
- पालक विश्वासाने व्हॅनचालकांकडे मुले सोपवितात. मात्र काही बेजबाबदार व्हॅनचालक फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहनेदेखील ज्या वेगाने पळवितात ते पाहून विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असल्याचेच चित्र दिसून येते.