अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक; जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
By सुनील चरपे | Updated: February 27, 2023 17:18 IST2023-02-27T17:18:06+5:302023-02-27T17:18:44+5:30
सावनेर-काटोल मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक; जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
सावनेर (नागपूर) : भरधाव अज्ञात वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सावनेर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-काटाेल मार्गावरील सावंगी (भैयाजी) शिवारात रविवारी (दि. २६) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
दादाराव बापूराव जीवताेडे (५५, रा. तिष्टी -माेठी, ता. कळमेश्वर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते कामानिमित्त सावनेरला आले हाेते. काम आटाेपून एमएच-४०/एजे-४५३९ क्रमांकाच्या माेटरसायकलने एकटेच सावनेरहून तिष्टीला जात हाेते. सावंगी (भैयाजी) शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली आणि वाहन लगेच निघून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी लगेच हितेश बन्साेड व पाेलिसांना सूचना दिली.
हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठून त्यांना जखमी अवस्थेत सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. त्यांच्या माेटरसायकलला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली तर काहींच्या मते त्यांच्या वाहनाला मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.