विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; नागपुरात महिंद्रा आणि अदानींकडून मोठी गुंतवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:42 IST2026-02-07T13:40:30+5:302026-02-07T13:42:06+5:30
विदर्भाच्या विकासाला आता बुलेट गती मिळणार! नागपुरात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्राचे पाऊल पडले असून, नामवंत कंपन्यांनी गुंतवणुकीचा महापूर आणला आहे.

विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; नागपुरात महिंद्रा आणि अदानींकडून मोठी गुंतवणूक!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी गुंतवणूक आणली जात होती. मात्र, ऑटोमोबाइल इंडस्ट्री विदर्भात आली नव्हती. त्यासाठी प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून पहिल्यांदा नागपूरमध्ये ऑटोमोबाइल उद्योगाचे पदार्पण झाले आहे. नागपुरात महिंद्रा कंपनी १५ हजार कोटींची गुंतवणूक करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव-ॲडव्हान्टेज विदर्भ-२०२६’चे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अल्बलगन, अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक जीत अदानी, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कांचनताई गडकरी, प्रख्यात उद्योजक पद्मश्री सत्यनारायण नुवाल, कौस्तुभ धवसे यांच्यासह स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या करारातून भारत आणि जागतिक बाजारासाठी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक व्हेईकल आणि ट्रॅक्टरचे उत्पादन नागपुरातून होणार आहे. या प्रकल्पासाठी आजच जागा निश्चितच करण्यात येणार आहे. कंपनीने संभाजीनगर येथे पुरवठा केंद्र, तर नाशिक येथे विस्तार केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर राज्यात आता नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ऑटोमोबाइल परिसंस्था होणार आहे.
नागपूर-अमरावती औद्योगिक मॅग्नेट
राज्याच्या समतोल विकासासाठी उद्योग धोरण आखण्यात आले असून, ज्या भागात उद्योग नाहीत अशा भागांचाही विकास साधला जाणार आहे. यासाठी राज्यात मॅग्नेट औद्योगिक क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. कोकणात रायगड, मराठवाड्यात संभाजीनगर, तर विदर्भातही नागपूर आणि अमरावती असे मॅग्नेट तयार करण्यात आले आहेत.
अदानीचा ७० हजार कोटींची प्रकल्प
नागपूरजवळील कळमेश्वर लिंगा येथे अदानी समूहातर्फे एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. यासाठी ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल, अशी माहिती अदानी एअरपोर्ट्सचे संचालक आणि अदानी डिजिटल
लॅब्सचे प्रमुख जीत अदानी यांनी येथे दिली.