नागपुरात उभा राहिला भारतातील पहिला ‘संविधान चौक’ ! लोकचळवळीने घडवलेले नवे पर्व

By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 16:01 IST2025-11-26T15:58:58+5:302025-11-26T16:01:47+5:30

‘संविधान चौक’ : नागपूरच्या परिवर्तनयात्रेची तेजस्वी कहाणी

India's first 'Constitution Chowk' erected in Nagpur! A new era created by the people's movement | नागपुरात उभा राहिला भारतातील पहिला ‘संविधान चौक’ ! लोकचळवळीने घडवलेले नवे पर्व

India's first 'Constitution Chowk' erected in Nagpur! A new era created by the people's movement

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
क्रांतीभूमी, धम्मभूमी आणि दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक आरबीआय चौकाचे ‘संविधान चौकात’ झालेले रूपांतर ही केवळ नामांतराची घटना नसून सामाजिक-जागृतीच्या चळवळीला नवी उभारी देणारी क्रांतिकथा आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत, देशाच्या मध्यबिंदूवर उभा असलेला ‘संविधान चौक’ हा भारतातील (बहुतेक) पहिला आणि अद्वितीय असा संविधानाला वाहिलेला सार्वजनिक स्तंभ आहे.
 
नागपूरचे आरबीआय चौक हे रिझर्व्ह बँक, विधानभवन, मॉरिस कॉलेज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यामुळे राजकीय-सामाजिक आंदोलनांचे केंद्रस्थान राहिले आहे. अन्यायग्रस्तांचा आक्रोश, संघर्ष आणि न्यायासाठीचे हुंकार इथूनच उठतात. अशा या क्रांतिभूमितूनच संविधानाचा जागर सुरू झाला. काही संघटना आपपापल्या स्तरावर संविधानानिमित्त जनजागृती करीत होत्या. परंतु सन २००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे शाळांमधून सामूहिक वाचन हा ‘संविधान ओळख’ उपक्रम सुरू केला आणि याला व्यापक स्वरूप आले. याच दिवशी २६ नोव्हेंबर २००५ आरबीआय चौकातून भव्य ‘संविधान रॅली’ निघाली. त्यानंतर याला लोकचळवळीचे व्यापक स्वरूप येऊ लागले. या जागरामुळे आणि ई.झेड. खोब्रागडे यांच्या पाठपुराव्यामुळे २४ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्र शासनाने २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ घोषित केले.

नामांतराची बीजे : ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांची ऐतिहासिक सूचना

२६ नोव्हेंबर २०११ रोजी संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान, कवी इ. मो. नारनवरे यांनी ‘आरबीआय चौकाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन या चौकाचे संविधान चौक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सूचना केली. ही सूचना तिथे उपस्थित असलेल्या डॉ. नितीन राऊत, भदंत विमलकीर्ती गुणसीरी, भदंत सदानंदजी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी स्वागताने मान्य केली. नागपूरकरांनीही ती उचलून धरली. 

 ...अन कार्यकर्त्यांनी रात्रभरात उभारला संविधान चौकाचा नामफलक 

आरबीआय चौकाचे नाव संविधान चौक करण्याबाबत नागपूरकरांकडून महानगरपालिकेकडे रितसर प्रस्ताव सादर करण्यात आला. महापौरांनी आश्वासन दिले. महापालिकेत संविधान चौक नामकरणाचा ठराव होणार असल्याचे संकेत मिळाले. परंतु निर्णय काही होत नव्हता. पाठपुरावा केल्यानंतरही निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत होती. यातच या चौकाला काही राजकीय नेत्यांचे नाव देणार असल्याच्या चर्चाही उठत होत्या. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी एका कार्यशाळेत यावर चर्चा झाली. ई.झेड. खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते. यात मनपा निर्णय घेत नसेल तर आपणच नामकरण करू, ठरले. कार्यकर्त्यांनी जागा पाहिली. २५ नोव्हेंबर रोजी रात्री नामकरणाचा फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रात्री रवी शेंडे, नरेश वाहने, राजन वाघमारे, दिवंगत बबन बोंदाडे, बाळू घरडे, सुधीर ढोके, दिलीप पाटील, महिपाल गेडाम, राजू डोंगरे, संघपाल उपरे, दिनेश अंडरसहारे, प्रकाश कुंभे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ठरल्यानुसार भला मोठा लोखंडी फलक आणला. निळू भगत यांनी त्यावर संविधान चौक असे नाव लिहून दिले होते. ते सुद्धा सहभागी होते. आरबीआयवर फलक आणला गेला. रोड डिव्हाडरच्या मध्ये खोदून फलक बसवण्यात आला. सिमेंट रेतीने तो पक्का करण्यात आला. अशा प्रकारे रात्रभरात फलक उभा राहिल्या. दुसऱ्या दिवशी संविधान दिनी दूरवरून हा फलक लक्ष वेधून घेत होता. लोकांनी त्याचे स्वागत केले. लोकचळवळीमुळे महानगरपालिका हलली. पुढच्या वर्षी २०१३ मध्ये महानगरपालिकेने अधिकृत ठराव करून ‘संविधान चौक’ हे नाव दिले. 

संविधानाचा भव्य स्तंभ देतोय दिशा

संविधानाचा जागर करणारे, संविधान चौक असलेले नागपूर हे भारतातील पहिले शहर ठरले. तसेच येथे भारतीय राजमुद्रा-अशोक स्तंभासह तिन्ही भाषेत संविधान प्रास्ताविका स्तंभ सुद्धा उभारण्यात आले आहे. नागपूरने केलेल्या या जागृतीचे परिणाम देशभरात दिसून येतात.आज अनेक शहरांमध्ये संविधान चौक तयार झाले असून संविधान स्तंभ उभारले जात आहे. 

Web Title : नागपुर में जन आंदोलन से बना भारत का पहला 'संविधान चौक'!

Web Summary : नागपुर का आरबीआई चौक जन जागरूकता से संविधान चौक में बदला, जो भारतीय संविधान को समर्पित है। संविधान की प्रस्तावना के सामूहिक पाठ से शुरू हुए आंदोलन का समापन चौक के आधिकारिक नामकरण के साथ हुआ, जिसने पूरे देश में समान पहलों को प्रेरित किया।

Web Title : Nagpur Establishes India's First 'Constitution Square' Through People's Movement!

Web Summary : Nagpur's RBI Square transformed into Constitution Square, a tribute to the Indian Constitution, driven by public awareness. The movement, ignited by collective readings of the Constitution's preamble, culminated in the square's official naming, inspiring similar initiatives nationwide.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.