मिहानमधील इंडामर एमआरओ अदानी डिफेन्सच्या ताब्यात
By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 11, 2025 20:06 IST2025-08-11T20:05:55+5:302025-08-11T20:06:48+5:30
एव्हिएशन एमआरओ क्षेत्रात विस्तार : १०० टक्के हिस्सेदारी खरेदी

Indamar MRO in Mihan taken over by Adani Defense
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (एडीएसटीएल) आपल्या व्हेंचर होरायझन एअरो सोल्यूशन्स लिमिटेडमार्फत प्राइम एअरो सर्व्हिसेस एलएलपीसोबत मिळून नागपुरातील मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडामर टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेडमधील (आयटीपीएल) १०० टक्के हिस्सेदारी नुकतीच खरेदी केली. इंडामर टेक्निक्स हा भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील एमआरओ आहे, हे विशेष.
होरायझन हा एडीएसटीएल आणि प्राइम एअरो यांचा ५०-५० टक्के भागीदारीतला व्यवसाय आहे. प्राइम एअरोचे मालक प्रजय पटेल हे इंडामर टेक्निक्सचे संचालकदेखील आहेत. एमआरओ म्हणजे विमानांच्या देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉलची सेवा. भारतात एमआरओ बाजार वेगाने वाढत असून, नागपूरचे भौगोलिक स्थान व मिहानमधील विशेष पायाभूत सुविधा यामुळे शहराला एमआरओ हब म्हणून विकसित होण्याची मोठी संधी आहे.
दहा हँगर व १५ विमाने ठेवण्याची क्षमता
आयटीपीएलने ३० एकर क्षेत्रफळात अत्याधुनिक ग्रीनफील्ड सुविधा उभारली आहे. या सुविधेत दहा हँगर असून त्यात एकूण १५ विमाने ठेवण्याची क्षमता आहे. आयटीपीएलला डीजीसीए, एफएए (यूएसए) आणि इतर जागतिक नागरी एव्हिएशन नियामक संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. ही कंपनी भारत आणि जगातील प्रमुख ग्राहकांना एमआरओ सेवा पुरवते. त्यात लीज रिटर्न चेक्स, हेवी सी-चेक्स, दुरुस्ती आणि विमान पेंटिंगचा समावेश आहे.
अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी म्हणाले, हे अधिग्रहण भारताला जगातील प्रमुख एमआरओ केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या उपक्रमातील पुढील पाऊल आहे. अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी म्हणाले, हे अधिग्रहण अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेसच्या व्हिजनमधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एमआरओ सेवा प्रदान करण्यास उत्सुक आहोत. इंडामर टेक्निक्स आणि प्राइम एअरोचे संचालक प्रजय पटेल म्हणाले, आम्ही अदानी डिफेन्स अँड प्राइमस्पेससोबत मिळून इंडामर टेक्निक्सला नवीन उंचीवर नेऊ. भारतातून एक जागतिक दर्जाचे एमआरओ इकोसिस्टम निर्माण होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.