थंडीच्या लाटेत गाेंदियाचा पारा ८.२ अंशावर, नागपुरातही गारठा; अजून किती दिवस थंडी कायम?
By निशांत वानखेडे | Updated: January 17, 2026 20:14 IST2026-01-17T20:10:37+5:302026-01-17T20:14:12+5:30
Nagpur : महापालिका निकालामुळे राजकारणाचा पारा तापला असताना वातावरणाचा पारा खाली घसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे चार दिवस चढलेला पारा ढगांची गर्दी हटताच पुन्हा घसरायला सुरुवात झाली.

In the cold wave, the mercury in Gondia is at 8.2 degrees, it is also cold in Nagpur; How many more days will the cold continue?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निकालामुळे राजकारणाचा पारा तापला असताना वातावरणाचा पारा खाली घसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे चार दिवस चढलेला पारा ढगांची गर्दी हटताच पुन्हा घसरायला सुरुवात झाली. गाेंदियाचा पारा ८.२ अंशावर घसरून थंडीच्या लाटेत गेला आहे. नागपुरातही पारा घसरून गारठा वाढला आहे. पुढचे दाेन-तीन दिवस थंडी आणखी वाढेल, असा अंदाज आहे.
ढगाळ वातावरणामुळे साेमवारपासून तापमानात क्रमाक्रमाने वाढ झाली. नागपुरात किमान तापमान ९.६ अंशांवरून वाढत १३ अंशांपर्यंत पाेहोचले हाेते. त्यामुळे गारठा थाेडा कमी झाला हाेता. मात्र, आकाशातून ढगांची गर्दी हटली आणि पुन्हा तापमान खाली आले. २४ तासांत तापमान १.६ अंशांनी घसरून शुक्रवारी पहाटे ११.४ अंशांची नाेंद करण्यात आली. त्यात पुन्हा १.२ अंशाची घसरण हाेत शनिवारी पहाटे किमान तापमान १०.२ अंशाची नाेंद झाली आहे, जे सरासरीपेक्षा ३.१ अंशाने कमी आहे. दरम्यान, संपूर्ण विदर्भात तापमान घसरण्याचे सत्र दिसून आले. गाेंदियात दाेन दिवसात तापमान ४.१ अंशांनी घसरून ८.२ अंशांवर खाली आले, जे राज्यात सर्वांत कमी आहे. येथील तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंशाने खाली आहे. इतर ठिकाणीही तापमान एक ते दोन अंशांनी खाली घसरले आहे. यवतमाळचे तापमान १० अंश नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा ४.९ अंशाने कमी आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ढगांची गर्दी हटल्याने येत्या काही दिवसांत तापमान पुन्हा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पुढचे किमान चार दिवस म्हणजे २० जानेवारीपर्यंत तापमान घसरून थंडीत वाढ हाेण्याचा अंदाज आहे. एक किंवा दाेन जिल्ह्यात नागरिकांना थंड लाटेचाही सामना करावा लागू शकताे. त्यानंतर पुन्हा ढगांची गर्दी हाेऊन तापमान अंशत: वाढेल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. ढगांमुळे तापमान वाढले असले तरी ते सरासरी खाली असल्याने थंडीचा प्रभाव टिकून राहिला आहे व ताे फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.