विदर्भातील पर्यटन वाढीसाठी आयआयएम नागपूरचे सहकार्य; राज्य सरकारचा प्रस्ताव
By आनंद डेकाटे | Updated: February 7, 2026 20:33 IST2026-02-07T20:32:33+5:302026-02-07T20:33:39+5:30
Nagpur : नैसर्गिक वनसंपदेने परिपूर्ण विदर्भातील पर्यटनवाढीसाठी आयआयएम नागपूर सहकार्य करणार आहे.

IIM Nagpur's cooperation for increasing tourism in Vidarbha; State government's proposal
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नैसर्गिक वनसंपदेने परिपूर्ण विदर्भातील पर्यटनवाढीसाठी आयआयएम नागपूर सहकार्य करणार आहे. प्रशिक्षण, क्षमतावाढ आणि स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देणे यादृष्टीने सरकारला मदत करणार असल्याची माहिती आयआयएम नागपूरचे संचालक डाॅ. भीमराया मेत्री यांनी पत्रकारांना दिली.
आयआयएम नागपूरमध्ये शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना डाॅ. मेत्री यांनी सांगितले की, सरकार पर्यटनवाढीवर भर देत आहे. आपल्याकडे ताडोबा, पेंंच सारखे मोठे पर्यटन स्थळ आहेत. यासोबतच इतर पर्यटनस्थळ सुद्धा विकसित केली जात आहेत. येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा, अधिकाधिक पर्यटकांचा ओढा विदर्भाकडे यावा, यासाठी पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास, डेस्टिनेशन मॅनेजमेंट आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आयआयएम नागपूरला प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला आहे. आयआयएम आपल्या तज्ज्ञांच्या मदतीने प्रशिक्षण, इकोसिस्टम डेव्हलप करणे आणि स्थानिक स्थरावरील वस्तूंना कसे प्रमोट करता येईल, यावर कार्य करतील.
ग्रामीण भागात छोटे उद्योजक वाढवण्यावर भर
आयआयएम नागपूरतर्फे विदर्भातील ग्रामीण भागात छोटे उद्योजक तयार करण्यावर अधिक भर दिला जात असून, अशा उद्योजकांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी अकराही जिल्ह्यांमध्ये छोटे सेंटर तयार केले जाणार असल्याचे डाॅ. मेत्री यांनी सांगितले. काही जण केवळ शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी उद्योग लावतात, पण ग्रामीण भागातील छोटे उद्योजक हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक व गंभीर असतात. त्यामुळे सरकारचा पैसाही वाचतो आणि ग्रामीण भागातील विकासालाही बळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करणार
नाशिक कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी आयआयएम नागपूर राज्य सरकारला व स्थानिक प्रशासनाला मदत करणार आहे. यासंदर्भात येत्या १५ तारखेला बैठक होत आहे, त्यात नेमके काय करायचे आहे, हे स्पष्ट होणार असल्याचेही डाॅ. मेत्री यांनी सांगितले.
गोवा येथे उपकेंद्र होणार
गोवा येथे आयआयएम नागपूरचे उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे. यासाठी जागाही मिळाली असल्याची माहिती मेत्री यांनी दिली. भविष्यात हैदराबाद येथे उपकेंद्र सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागपूरच्या कॅम्पसमधील जागा आता कमी पडू लागली असल्याने नवीन हाॅस्टेल, सभागृह व इतर इमारती बांधण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.