रासायनिक खते हवी आहे तर कीटकनाशके खरेदी करा; लिंकिंगमुळे शेतकरी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:43 IST2025-11-13T18:40:39+5:302025-11-13T18:43:57+5:30
Nagpur : रामटेक तालुक्यातील कृषी सेवा केंद्र मालकांचा प्रताप

If you want chemical fertilizers, buy pesticides; Farmers in trouble due to linking
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीत लिंकिंग करणे बेकायदेशीर असल्याचे कृषी विभागाच्यावतीने वारंवार सांगितले जात आहे. मात्र, रामटेक तालुक्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्र मालक रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना कीटकनाशके किंवा बुरशीनाशके अथवा इतर औषधे खरेदी करण्याची सक्ती करीत आहेत. या प्रकारामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, गव्हाच्या पिकासाठी आवश्यक असलेली खते खरेदी करताना त्यांना अतिरिक्त पदरमोड करावी लागत असल्याने कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्या रब्बी पिकांच्या पेरणीचा हंगामात सुरू झाला आहे. रामटेक तालुक्यातील काही शेतकरी धानाची कापणी केल्यानंतर त्या बांध्यांमध्ये गव्हाचे पीक घेते. गव्हाच्या पिकाला नत्राची नितांत आवश्यकता असल्याने शेतकरी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. रामटेक तालुक्यातील शेतकरी गव्हाला युरियाचे किमान तीन डोज देतात. युरिया खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये गेल्यावर दुकानदार युरियासोबत कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक खरेदी करण्याचा आग्रह करतात. कीटकनाशक किंवा बुरशीनाशक खरेदी करण्यात नकार देताच दुकानदार युरिया देण्यास स्पष्ट नकार देतात, अशी माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली.
यासंदर्भात काही कृषी सेवा केंद्र मालकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही ज्या वितरक किंवा स्टॉकिस्टकडून माल खरेदी करतो, तेच आम्हाला लिंकिंग करून देतात. त्यामुळे त्याचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागतो. आम्ही शेतकऱ्यांना खतांसोबत तीच औषधे खरेदी करण्याची सूचना करतो, जी औषधे त्या काळात पिकांसाठी फायद्याची असतात. इतर कुठल्याही अनाठायी औषधांची आम्ही शेतकऱ्यांना सक्ती करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारवाई टाळण्याची नवी शक्कल
दुकानदारांच्या सांगण्यावरून आपण युरियासोबत कीटकनाशके किंवा बुरशीनाशके खरेदी केल्यास दुकानदार शेतकऱ्यांना केवळ युरियाची बिले देतात. त्यावर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा उल्लेख नसतो. ते कीटकनाशकाचे वेगळे बिलदेखील देत नाही. मात्र, शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करतात, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. कारवाई टाळण्यासाठी तसेच कृषी विभागाच्या हाती पुरावे मिळू नये यासाठी कृषी सेवा केंद्र मालकांनी बिले न देण्याची शक्कल लढविली आहे. ते कृषी निविष्ठांचा स्टॉक मेन्टेन करण्यासाठी काहीही करतात, असे जाणकार व्यक्तींनी सांगितले.
आदेशाची पायमल्ली
कृषी सेवा केंद्र मालकांनी कोणत्याही कृषी निविष्ठा लिंक करू विकू नये किंवा त्या खरेदी करण्याची शेतकऱ्यांना सक्ती करू नये, असे आदेश राज्य सरकारच्या कृषी विभागाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. या विभागाने तशा सूचना कृषी सेवा केंद्र मालकांना देऊन त्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीदेखील केली होती. मागील काही दिवसांपासून रामटेक तालुक्यातील कृषी सेवा केंद्र मालकांनी या आदेशाची पायमल्ली करणे सुरू केले आहे. असे प्रकार आढळल्यास तक्रारी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. मात्र, कुणीही त्यांच्याकडे फारशा तक्रारी करीत नाहीत.
"कोणत्याही कृषी निविष्ठांची विक्री करताना त्यांचे लिंकिंग करणे चुकीचे आहे. याबाबत आपण सर्व कृषी सेवा केंद्र मालकांना लेखी सूचना पाठविल्या आहेत. काही तक्रारींची आम्ही चौकशी केली, पण तसे काही आढळून आले नाही. असे काही आढळून आल्यास शेतकऱ्यांनी आम्हाला कळवावे, आम्ही त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू"
- सुनील कोरटे, तालुका कृषी अधिकारी, रामटेक