‘पैसे नाही दिलेस तर परिणाम भोग’, धमकीच बनली मृत्यूचे कारण ! प्रकरणातील दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:18 IST2025-09-22T15:13:28+5:302025-09-22T15:18:07+5:30
समीर येडा खून प्रकरण : तांदूळ तस्करीतील पैशाच्या वादातून खून !

'If you don't pay, you will face the consequences', threat became the cause of death! Two accused in the case arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समीर येडा याच्या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या टोळीतील सूत्रधार अस्सू ऊर्फ अफसर तसेच त्याचा साथीदार शुभम ऊर्फ शुभ्भू शेंद्रे यांना अटक केली होती. परंतु, अस्सू टोळीतील इतर सदस्य घटनेपासून फरार होते. पोलिसांनी या टोळीतील आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
मोहम्मद समीर समशेर खान (२८, राजीव गांधीनगर) याची ७ ऑगस्ट रोजी पहाटे राजीव गांधी पुलाजवळ हत्या करण्यात आली. अस्सू हा तांदळाच्या तस्करीचे रॅकेट चालवायचा व त्याला समीरने पैसे मागितले होते. त्या वादातूनच समीरचा गेम झाल्याची बाब आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. हत्येच्या तीन दिवसांपासून अस्सू व त्याचे साथीदार समीरच्या मागावर होते. येथील त्याच्या सासुरवाडीहून समीर घराकडे परत जात असताना आरोपींनी त्याला पुलाजवळ गाठले व त्याची हत्या केली. समीरने अस्सूला पैशांची मागणी केली होती व पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, असे म्हटले होते. त्यामुळेच अस्सूने त्याचा गेम केला. आरोपींमध्ये शेख शाहबाज ऊर्फ सायबा ऊर्फ शेख सिकंदर (२३. घाट चौक, शांतीनगर), हर्षित धर्मपाल मेश्राम (२०), शिबू, फहीम चुहा, इस्तियाक काल्या, अक्षय यांचा समावेश होता. सायबा व हर्षित यांना पोलिसांनी शांतीनगरातील बांगडे प्लॉटमधून तांत्रिक तपासाच्या आधारावर अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे, सुहास राऊत, दिलीप पाटील, सदाशिव कनसे, प्रशांत कोडापे, अशोक तायडे, राहुल इंगोले, नितेश मिश्रा, सन्नी मतेल, रितेश दुधे यांच्या पथकाने ही कारवाई केली.