मुंबई, पुण्यात बससेवा सुरू तर नागपुरात का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:13 PM2020-06-09T22:13:42+5:302020-06-09T22:15:14+5:30

मुंबई-पुण्यासारख्या शहरात शहर बससेवा सुरू झाली आहे. आता नागपुरातही शहर बससेवा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. आपली बसच्या माध्यमातून नागपुरात दररोज १.७५ लाख नागरिक प्रवास करतात. अद्याप सर्व प्रतिष्ठाने सुरू झालेली नाहीत. परंतु बस प्रवासासाठी प्रवाशांना सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक करून आपली बस सुरू केली जाऊ शकते.

If bus service is available in Mumbai and Pune, why not in Nagpur? | मुंबई, पुण्यात बससेवा सुरू तर नागपुरात का नाही?

मुंबई, पुण्यात बससेवा सुरू तर नागपुरात का नाही?

Next
ठळक मुद्देकामगारांना कारखान्यात ये-जा करणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून आपली बससेवा बंद आहे. आता औद्योगिक क्षेत्रातील कारखाने तसेच दुकाने, प्रतिष्ठाने सुरू झाल्याने परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे. परंतु कारखाने व दुकानापर्यंत ये-जा करण्यासाठी शहरातील नागरिकांना व कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषकरून मिहान, बुटीबोरी यांसारख्या औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक परिवहन सेवा अद्याप सुरू झालेली नाही. दुसरीकडे ऑटो वा टॅक्सीच्या माध्यमातून कामगारांना ये- जा परवडत नाही. कारण कामगारांना मिळणाऱ्या मजुरीच्या तुलनेत अधिक भाडे द्यावे लागते.
मुंबई-पुण्यासारख्या शहरात शहर बससेवा सुरू झाली आहे. आता नागपुरातही शहर बससेवा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. आपली बसच्या माध्यमातून नागपुरात दररोज १.७५ लाख नागरिक प्रवास करतात. अद्याप सर्व प्रतिष्ठाने सुरू झालेली नाहीत. परंतु बस प्रवासासाठी प्रवाशांना सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक करून आपली बस सुरू केली जाऊ शकते.
औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी शहराच्या विविध भागांतील हजारो कामगार दररोज बसने प्रवास करतात. आपली बससेवा ही कामगारांसाठी ‘लाईफलाईन’ ठरली आहे. व्यवसाय व कारखाने सुरू झाल्याने बससेवा सुरू करण्याची गरज आहे. कामगारांना कारखान्यापर्यंत पोहोचता यावे, यासाठी बससेवा सुरू करणे आवश्यक आहे. मुंबई- पुणे शहराच्या धर्तीवर नागपुरातही बससेवा सुरू करण्यात काही अडचण नाही. मुंबई-पुणे शहराच्या तुलनेत नागपुरात रिकव्हरी रेट चांगला असून रुग्णांची संख्याही कमी आहे.

औद्योगिक परिसरात बस सुरू करण्याची मागणी
बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर, खापरखेडा आदी भागातील कामगारांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. मनपा आयुक्तांनी लॉकडाऊनमध्ये सवलत दिली आहे. आॅटोला सवलत दिली आहे. त्या धर्तीवर सामाजिक अंतर व मास्कचा वापर बंधनकारक करून बससेवा सुरू करता येऊ शकते.

बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू करा-बोरकर
केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली आहे. मुंबई व पुणे शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे. नागपूर शहरातही बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू करावी, अशी मागणी परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी मनपा आयुक्तांना मंगळवारी दिलेल्या पत्रातून केली आहे.

Web Title: If bus service is available in Mumbai and Pune, why not in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.