परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधीच बाप-लेकीचा अंत; विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:33 IST2026-02-13T12:30:45+5:302026-02-13T12:33:08+5:30
Nagpur HSC Student Death: डोंबिवलीतील दुर्दैवी घटनेची जखम ताजी असतानाच, नागपुरातून एक अत्यंत चटका लावून जाणारी बातमी समोर आली. इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी वडिलांसोबत निघालेल्या विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

परीक्षा केंद्रावर पोहोचण्याआधीच बाप-लेकीचा अंत; विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडले!
डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नागपूरमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीसह तिच्या वडिलांवर काळाने घाला घातला. मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला. तर, एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी भिवणकर आणि तिचे वडील सुभाष भिवणकर अशी मृतांची नावे आहेत. त्नवी आणि तेच वडिल दुचाकीवरुन जात असताना मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ त्यांच्या विरुद्धदिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तन्वी आणि तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, वंशिका नरुळे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी ट्रक चालक प्रफुल भोयरला याला पकडून मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांनी ट्रकच्या केबिनला आग लावली. या घटनेत ट्रकचे नुकसान झाले. याप्रकरणी उमरेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.