विषारी औषधे कशी कळणार? राज्यात औषध तपासणी निरीक्षकांची तब्बल ७८ टक्के पदे रिक्त
By सुमेध वाघमार | Updated: October 7, 2025 17:26 IST2025-10-07T17:24:31+5:302025-10-07T17:26:11+5:30
Nagpur : या गंभीर मनुष्यबळ तुटवड्यामुळे सरकारी आणि खासगी औषध दुकानांची व औषधांची नियमित तपासणी होत नाही, परिणामी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार

How will toxic drugs be detected? As many as 78 percent of drug inspection inspector posts are vacant in the state
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका बाजूला मध्य प्रदेशातील ९ बालकांचा 'डायएथिलीन ग्लायकॉल' नावाच्या विषारी घटकामुळे जीव गेला असताना आणि नागपुरात भेसळयुक्त औषधींची दोन मोठी प्रकरणे उघडकीस आली असताना, राज्यात औषध नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनांतर्गत (एफडीए) औषध निरीक्षकांची तब्बल ७८ टक्के पदे रिक्त आहेत. या गंभीर मनुष्यबळ तुटवड्यामुळे सरकारी आणि खासगी औषध दुकानांची व औषधांची नियमित तपासणी होत नाही, परिणामी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
नागपूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या औषध भांडारात अँटिबायोटिक असलेल्या 'रेसीफ-५००' या गोळ्यांमध्ये महत्त्वाचा घटक 'सिप्रोफ्लोक्सासिन' आढळलाच नाही. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. या घटनेपाठोपाठ मेडिकलच्या औषध भांडारात 'रिक्लॅव्ह ६२५' हे अँटिबायोटिक औषध बनावट आढळल्याने मोठी खळबळ माजली. धक्कादायक बाब म्हणजे, औषध बनावट असल्याचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच जवळपास ७७ हजार बनावट गोळ्या रुग्णांना वाटण्यात आल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले, पदे रिक्त असल्याने आवश्यकतेनुसार औषधी तपासणी होत नसल्याने या प्रकरणांची व्याप्ती मोठी असण्याची भीती आहे.
तीनच प्रयोगशाळा, अहवालाला दीड महिना!
रिकाम्या जागांसोबतच, भेसळयुक्त औषधे तपासणीसाठी राज्यात केवळ नागपूर, नाशिक आणि पुणे या तीनच ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. संपूर्ण राज्याच्या औषधींचा भार या तीन प्रयोगशाळांवर असल्याने तपासणी अहवाल यायला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. यामुळे विषारी कफ सिरपसारख्या औषधींचे वितरण होईपर्यंत रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे.
२०० पैकी ४५ जागा भरलेल्या
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनांतर्गत औषध निरीक्षकांच्या २०० जागा मंजूर आहेत. यातील ४५ जागा भरलेल्या असून, तब्बल १५५ जागा आजही रिक्त आहेत. २०१२ पासून भरती प्रक्रियाच बंद असल्याची माहिती आहे.
लवकरच १०९ पदे भरणार
"औषधी निरीक्षकांची १०९ पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात आली असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. राज्यात आणखी दोन प्रयोगशाळांची भर पडणार असून, त्यांची एकूण संख्या पाच होईल. औषध निरीक्षकांच्या मंजूर पदांमध्ये ७५ पदे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे."
-डी. आर. गहाणे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र