संविधान कसे तयार झाले? संविधान सभेतील संपूर्ण चर्चा आता मराठीत
By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 16:40 IST2025-11-26T16:38:36+5:302025-11-26T16:40:49+5:30
Nagpur : नागपूरचे देविदास घोडेस्वार यांची महत्त्वपूर्ण कामगिरी

How was the Constitution formed? The entire discussion in the Constituent Assembly is now in Marathi
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडे कुणीही उठतो आणि संविधानाबाबत उठसूठ काहीही बरळत बसतो. परंतु संविधान काही सहजासहजी कुणाच्या मनात आले म्हणून काहीही कलम तयार झाले असे नाही. संविधान सभेत तेव्हा सर्वच दिग्गज मंडळी होती. प्रत्येक लहान-सहान बाबीवर प्रदीर्घ अशी चर्चा झाली. वादविवाद झाले. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने कुठे एका गोष्टीवर एकमत होऊन कलम तयार होत गेली. संविधान सभेतील ही सर्व चर्चा (Constituent Assembly Debates) ग्रंथरूपात आजही संसदेमध्ये उपलब्ध आहे. हे संपूर्ण खंड इंग्रजी भाषेत होते. नागपूरचे देविदास घोडेस्वार यांनी भारतीय संविधान निर्मितीतील ऐतिहासिक दस्तऐवज ‘संविधान सभेतील वादविवाद’ मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे संविधान निर्मिती प्रक्रियेतील गुंतागुंती, चर्चा आणि विचारमंथन आता मराठी वाचकांपर्यंत सहजपणे पोहोचले आहे.
संविधानासारख्या मूलभूत ग्रंथाच्या निर्मितीच्या मागील प्रक्रिया, त्यातील वादविवाद, प्रस्ताव, हरकती आणि नेत्यांचे विवेकी मुद्दे सामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने घोडेस्वार यांनी ‘संविधान सभा डिबेट्स (मराठी)’ हे रूपांतर तयार केले. ९ डिसेंबर १९४६ ते २४ जानेवारी १९५० या काळात संविधान सभेत जे डिबेट्स झालेत ते सर्व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. इंग्रजीचे एकूण ५ खंड आहेत. ते सर्व मराठीमध्ये अनुवाद करण्यात आले. मराठीत एकूण दहा खंड तयार झाले. २०१३ मध्ये पहिले ३ खंड प्रकाशित झाले. २०१४ मध्े दुसरे ३ खंड आणि २०१५ मध्य ४ खंड प्रकशित झाले.
या पुस्तकातून संविधान कसे आकारास आले, कोणते मुद्दे चर्चेत होते, विविध सदस्यांची भूमिकांची तपशीलवार माहिती मराठीतून उपलब्ध झाली आहे. घोडेस्वार यांच्या या कार्याचे खास महत्त्व असे की संविधान निर्मिती ही अत्यंत जटिल व विचारप्रधान प्रक्रिया होती. त्यातील अनेक मुद्दे, मतभेद आणि निर्णयप्रक्रियेतील तपशील मराठी भाषिकांना सहजपणे समजावेत, यासाठी त्यांनी केलेले भाषांतर मोठे योगदान ठरते.
संविधान सभेतील वादविवादांचे मराठीकरण उपलब्ध झाल्याने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मुलभूत मूल्यांविषयी जागरूकता वाढीस लागण्यास मदत होत आहे. घोडेस्वार यांचे प्रयत्न संविधानाचे तत्त्वज्ञान जनसामान्यांच्या भाषेत सहजपणे पोहोचवणारे ठरत आहेत.