'सीसीआय'ला एवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा होतो तरी कसा ?
By सुनील चरपे | Updated: March 25, 2026 12:41 IST2026-03-25T12:35:53+5:302026-03-25T12:41:06+5:30
Nagpur : सन २०२३-२४ च्या हंगामात देशात एकूण ३४९ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. सीसीआयने यातील ९.४० टक्के म्हणजेच ३२.८१ लाख गाठी कापूस एमएसपी दराने खरेदी केला.

How is it that CCI is incurring such huge losses?
सुनील चरपे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सन २०२३-२४ च्या हंगामात देशात एकूण ३४९ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. सीसीआयने यातील ९.४० टक्के म्हणजेच ३२.८१ लाख गाठी कापूस एमएसपी दराने खरेदी केला. या खरेदीत त्यांना १,७१८.५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, केंद्र सरकारने त्यांना हा निधी १८ मार्च २०२६ ला भरपाईपोटी दिला आहे. या हंगामात कापसाचे दर एमएसपीच्या आसपास असूनही सीसीआयला एवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा होतो कसा, यावे स्पष्टीकरण सीसीआय अथवा केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालय देत नाही.
सीसीआयने २०२३-२४ च्या हंगामात देशातील १२ कापूस उत्पादक राज्यांमधील १४९ जिल्ह्यांमध्ये एकूण ४४९ खरेदी केंद्र सुरू करून प्रतिक्विंटल ७,०२० रुपये या एमएसपी दराने ३२.८१ लाख गाठी कापूस खरेदी केला. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात खुल्या बाजारातील कापसाचे दर एमएसपीच्या खाली म्हणजेच प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,९०० रुपये, १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२४ या काळात ६८०० ते ७,२०० तसेच १ मे ते ३० सप्टेंबर २०२४ या काळात ७,३०० ते ७,६०० रुपयांच्या दरम्यान होते. या हंगामात सीसीआयने सर्वाधिक २४ लाख गाठी कापूस तेलंगणात तर सर्वात कमी ३८ हजार गाठी कापूस पंजाबमध्ये खरेदी केला.
शेतकऱ्यांचे ६,६३० कोटींचे नुकसान
दरातील चढ-उतार विचारात घेता देशातील शेतकऱ्यांनी एकूण उत्पादनाच्या ३१६.१९ लाख गाठी म्हणजेच २०.६० टक्के कापूस मिळेल त्या दराने व्यापाऱ्यांना विकला. सीसीआयला केवळ ३२.८१ लाख गाठी कापूस खरेदीत तर १,७१८.५६ कोटी रुपयांचा तोटा होतो तर शेतकऱ्यांनी किमान २६० लाख गाठी कापूस एमएसपीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे किमान ६,६३० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई देणार कोण?
ओलाव्याचे कारण व कमी दर
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कापसाची आवक अधिक असते. याच काळात कापसात ओलाव्याचे प्रमाण अधिक असते व सीसीआय अधिक कापूस खरेदी करते. सीसीआय दरवर्षी ओलाव्याचे कारण पुढे करून प्रति टक्का ओलाव्याप्रमाणे एमएसपी दरात १० टक्के कपात करून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करते. पण, ओलावा जर कमी असेल, तर सीसीआय शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा १० टक्के दर अधिक देत नाही.
महाराष्ट्रात मात्र २.४४ लाख गाठी कापूस खरेदी केला होता. खुल्या बाजारातील कापसाचे दर एमएसपीपेक्षा कमी असणे, जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीज किरायाने घेणे, कापसाची संथ आवक, रुईच्या गाठी तयार करणे, कापूस व गाठींचा वाहतूक तसेच साठवणूक खर्च, या खर्चाच्या रकमेवरील व्याज, रुईच्या गाठी व सरकीची बाजारभावाप्रमाणे विक्री करणे यासह अन्य कारणांमुळे तोटा होतो, असे सीसीआयने स्पष्ट केले आहे. वास्तवात, हा तोटा कमी करण्यासाठी सीसीआयने आजवर कुठल्याही सुधारणा केल्या नाहीत.