Weather Prediction: हवामानाचे अंदाज बांधतात तरी कसे ? तीन-चार महिन्यांआधी मान्सूनचा अंदाज लागतोच कसा ?
By निशांत वानखेडे | Updated: July 28, 2025 12:30 IST2025-07-28T12:29:55+5:302025-07-28T12:30:50+5:30
How Weather is Rredicted: उपग्रह, आधुनिक उपकरणांनी बदलली स्थिती : पण तंतोतंत भाकीत?

How do you predict the weather? How can you predict the monsoon three-four months in advance?
नागपूर : वेळेवर येणारा पाऊस हवाहवासा असतो आपण तो वेळेवर येईलच याची शाश्वती नाही. पावसाचा लहरीपणा कायमच शेती व लोकांसाठी डोकेदुखी असते. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यामुळे पावसाचा अंदाज बांधणे आता जिकरीचे झाले आहे. तरीही पावसाचे व एकूणच हवामानाचे अंदाज काढणे महत्त्वाचे असते. कारण पीकपाण्यापासून देशाच्या अर्थकारणाचे भवितव्य अवलंबून असते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने अंदाज बांधले जात, पण त्यास शास्त्रीय आधार नसतो. हवामान विभागाने या परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन केले आहे. डॉप्लर रडार ते जमिनीवरील उपकरणांपासून अवकाशात भ्रमंती करणाऱ्या उपग्रहांच्या मदतीने पाऊस, तापमान, वारे व इतर हवामान घटकांचे ठोकताळे लावले जातात. हे अंदाज कधी अचूक ठरतात, तर कधी फसतातही. तंतोतंत खरे ठरत नसले तरी येणाऱ्या वातावरणीय परिस्थितीनुसार पावले उचलण्यास मदतच होते. आतातर जागतिक स्तरावर एकाकडून दुसऱ्या देशातील हवामानाचे विश्लेषण सोपे झाले आहे.
भारतीय हवामान विभाग, पुणेचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुले यांनी हवामान अंदाजाचे हे गणित उकल करून सांगितले. भारतीय हवामान खात्याकडून, रडार उपग्रहाद्वारे २४ तासांच्या आतील नाउकास्टिंगसारखे काही तासासाठीचे किंवा १ ते ३ दिवसापर्यंतचे पाऊस तापमान वारे व इतर हवामान घटकांचे लघु पल्ल्याचे आणि ४ ते १० दिवसांपर्यंतचे असे मध्यम पल्ल्यांचे अंदाज दिले जातात. त्याचबरोबर मोसमी पावसाचे आगमन व निर्गमनसहित, वर्षातील एकूण सर्व हंगामाचे, शिवाय विशिष्ट परिस्थितीनुसार उद्भवलेले चक्रीवादळ आणि टोकाच्या वातावरणानुसार एकूण पर्जन्यमानाच्या शक्यतेचे शेती व जलसंधारण नियोजनासाठी दीर्घ, पल्ल्याचे तसेच विस्तारित दृष्टिकोन श्रेणीतील अंदाज दिले जातात. हे अंदाज विविध प्रकारच्या हवामान आकड्यांवर आधारित व तंत्राद्वारे दिले जातात.
सिनोप्टिक निरीक्षण आधारित अंदाज
- समुद्र सपाटीवरील समान हवेच्या दाबाचा रेषेचा नकाशा, उंचावरील विविध हवेच्या दाबाच्या पातळीतील वारा वहन दिशा व गतीचा नकाशा, तापमानाचा नकाशा, विविध उंचीवरील भौगोलिक रचनेचा नकाशा.
- दवांक तापमान नकाशा, हवेचा दाब बदल शक्यता तसेच विसंगत नकाशा, कमाल किमान तापमान नकाशा, सॅटेलाइट (उपगृह) प्रतिमा आदी माहिती विचारात घेतली जाते.
- उपग्रहाद्वारे ढगाच्या वरच्या पृष्ठभागाचे तापमान, ढगाच्या वहनाचा वारा व्हेक्टर, आर्द्रतेमुळे वारा वहन, दीर्घ-लहरी उष्णता ऊर्जा, विंड शिअर, डायव्हर्जन्स व कॉन्व्हर्जन्स पॅटर्नची माहिती घेणे.
- जागतिक पातळीवरील विविध मॉडेलचे निष्कर्ष अभ्यासने, महासागरीय क्षेत्रात संचारणाऱ्या जहाजावरून तसेच आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानाद्वारे हवामानाची माहिती घेणे.
- वेदर व डॉप्लर रडारची निरीक्षणे अभ्यासने
तीन-चार महिन्यांआधी मान्सूनचा अंदाज लागतोच कसा ?
- युरोपातील देशांचे जमिनीवरील जानेवारी महिन्याचे हवेच्या तापमानाची विसंगती
- फेब्रुवारी व मार्च महिन्यातील विषुववृत्तांवरील समुद्री गरम पाण्याच्या आकारमानाची विसंगती
- डिसेंबर व जानेवारी महिन्यातील वायव्य प्रशांत महासागर व वायव्य अटलांटिक महासागराच्या पाण्याच्या तापमानाचा अंतरानुसार पडणारा फरक नोंद
- फेब्रुवारी महिन्यातील भारताच्या आग्नेय महासागराच्या पाण्याचे तापमान
- फेब्रुवारी व मार्च महिन्यातील पूर्व आशियातील देशांचे समुद्र सपाटीचा हवेचा दाब
- आदल्या वर्षाच्या मार्चपासून पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत प्रशांत महासागराच्या पाण्याचे निनो ३.४ क्षेत्राचे तापमान
- मे महिन्यातील उत्तर अटलांटिक महासागराचे समुद्र सपाटीचा हवेचा दाब
- मे महिन्यातील उत्तर मध्य प्रशांत महासागरावरील व्यापक क्षेत्रावरील अंतरानुसार वाऱ्यातील होणाऱ्या बदलाची नोंद.
पारंपरिक तांत्रिक तसेच सांख्यिकी पद्धतीबरोबरच हवामान घटकांचे निरीक्षण व त्यांची ताळमेळ बांधणी व त्यांच्या नमुन्याचे विश्लेषण करून अंदाज बांधतात. आधुनिक संगणकीय आदर्श नमुने आधारित मॉडेल्स. वातावरणीय स्थितीनुसार व त्या आधारे हुबेहूब कॉपी करून संख्यात्मक हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात. ज्या क्षणी अंदाज द्यायचा त्या क्षणाचा रडार व उपग्रहाद्वारे हवामानाच्या 3 घटकांचे निरीक्षण करून अंदाज दिला जातो. देशातील विविध हवामानाच्या केंद्रातील जमीन पातळीवरील उपकरणद्वारे, तसेच विंड प्रोफाइल व हवेत बलून सोडून उंचावरील विविध पातळीवरील घटकांचे निरीक्षण आकडे गोळा करून अंदाज दिले जातात.
"अलीकडच्या दशकात जागतिक तापमानवाढ व हवामान बदलामुळे हवामानाचा पॅटर्न बदललाय. मध्येच पाऊस पडतो, मध्येच ऊन पडते. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. दुष्काळी भागात अधिक पाऊस पडायला लागला आहे. पावसातील खंड वाढले व अपेक्षित तारखेला खंडही पडत नाही. त्यामुळे हवामानाचे अंदाजही क्षणोक्षणी बदलत आहेत."
- माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ