एकाच घरात २०० पेक्षा अधिक मतदार कसे ? नगरपालिकांच्या निवडणुकीआधी मतदार यादीत गोंधळाचा स्फोट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:21 IST2025-10-13T16:19:21+5:302025-10-13T16:21:26+5:30
Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडून या मतदार यादीची तपासणी केली जात आहे.

How can there be more than 200 voters in one house? Explosion of confusion in the voter list before the municipal elections!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. अशात हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार आढळून आल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडून या मतदार यादीची तपासणी केली जात आहे. या तपासणीत वानाडोंगरी शहरातील राजीव नगर (सरोदीपुरा) प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकाच घर क्रमांक १ वर तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार राहात असल्याचे दाखविण्यात आले आहे. यासोबतच एकाच आडनावाचे तब्बल २७ सदस्य सुद्धा एकाच घरात राहात असल्याचे यादीत आढळल्याचे सांगितले जाते. राजीव नगरच नव्हे, तर हिंगणा विधानसभा क्षेत्रातील नगर परिषद बुटीबोरी, वाडी, वानाडोंगरी, डिगडोह (देवी), नीलडोह, हिंगणा, गोधनी रेल्वे आदी भागातही असेच प्रकार आढळून आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बेसा पिपळा : केवळ मतदारांचे नाव, घर क्रमांक व पत्ता नाहीच
बेसा पिपळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील यादी भाग क्रमांक ३९२-१ मध्ये बेसा बेलतरोडी, पिपळा व घोगली येथील मतदारांची नावे आहेत. यामध्ये केवळ मतदारांचीच नावे आली आहेत. त्यांचे छायाचित्र, घर क्रमांक आणि रहिवासी पत्ता दिलेला नाही. तेव्हा मतदारांना जर काही आक्षेप घ्यायचाच असेल तर तो कसा घेणार? संबंधित नाव हे त्याच मतदाराचे आहे हे कसे समजणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
"राज्य निवडणूक आयोगाने व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवावी आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करावी."
- दिनेश बंग, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते
"निवडणूक आयोग यांच्याद्वारे प्राप्त झालेली ही मतदार यादी आहे. ती नगरपालिकेद्वारे विविध वॉर्डात विभाजित केली जाते. सदर घर क्रमांक हे मालमत्ता क्रमांक नाहीत. ही मतदार यादी तयार करण्याचे काम नगरपालिका करत नाही. नगरपालिका केवळ आयोगाद्वारे प्राप्त झालेल्या मतदार यादीचे वॉर्डनुसार विभाजन करते."
- राहुल परिहार, मुख्याधिकारी, वानाडोंगरी नगर परिषद